वर्धा - लॉकडाऊनमुळे वीज बिलाचे रिडींग घेऊ न शकल्यामुळे आता बील पाठवण्यात आले आहे. यामुळे अचानक 3 महिन्याचे देयक हे वाढीव असल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टीचे आमदार दादाराव केचे यांनी आर्वीत वीज बिलाची होळी केली. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित असून शिवाजी चौकात या वीज बिलाची होळी करण्यात आली. तसेच वीज बिल माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमध्ये लोकांना घरात अडकून राहावे लागले. अनेकांची दुकाने बंद पडलीत, काहींना रोजगार गमवावे लागले. यामुळे अगोदरच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असताना वाढीव बिलाचा भुर्दंड न देता वीज बिल माफ करावे या मागणीसाठी अमादर दादाराव केचे यांनी वीज बील जाळून निषेध नोंदवला.
एरवी येणाऱ्या बिलाच्या तुलनेत जून महिन्यात रिडींग घेऊन दिलेले बिल हे भरमसाठ आहे. यामुळे सर्व सामान्य रोजनदारीवर काम करणाऱ्यांच्या घरात सुद्धा कधी नवहे एवढे बिल आल्याने कुठून भरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी भाजपचे विनय देशपांडे, प्रकाश गुल्हाने, सुनील वाजपेयी, मिलिंद हिवाळे, अश्विन शेंडे, राजेश ठाकरे, मयूर पोकळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, उपस्थित होते.