नाशिक- लॉकडाऊन काळात मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला जाण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास मोटारीतून केला असताना प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार हे नाशिकमध्ये हेलिकॉप्टरने आले. अशात अक्षय कुमार यांना हेलिकॉप्टरची परवानगी कोणी दिली ? हॉटेल बंद असताना अक्षय कुमार याना रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी परवानगी कोणी दिली ? ग्रामीण भागात अक्षय कुमार यांच्या दौऱ्याला नाशिक शहर पोलिसांचा ताफा कसा होता? असे अनेक प्रश्न छगन भुजबळांना पत्रकारांनी विचारल्यावर भुजबळांनी याबाबत चौकशी केली जाईल, असे म्हटले होते. मात्र काही तासानंतर भुजबळांनी याबाबत एक पत्रक जाहीर करत यू टर्न घेतला आहे.
पत्रकात, या प्रकरणाची मी जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, अक्षय कुमार हे डॉ. आशर यांच्याकडे उपचार घेत असून तपासणीसाठी आले होते. पोलीस आयुक्त हे अक्षय कुमार यांच्या कोविड पार्श्वभूमीवर उत्तम कामगिरीबाबत शुभेच्छा देण्यासाठी व आभार मानण्यासाठी गेले होते. पोलिसांचा ताफा हा अक्षय कुमार यांच्यासाठी नसून पोलीस आयुक्त यांच्यासाठी होता. जिल्हाधिकारी यांच्या माहिती नतंर माध्यमांनी गैरसमज पसरू नये, असे भुजबळ यांनी म्हटले. एकूणच भुजबळांनी दिलेल्या या प्रतिक्रिये नतंर अक्षय कुमार यांच्या हेलिकॉप्टर दौऱ्याच्या वादावर पडदा पडला आहे.