सातारा - जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. आज (मंगळवारी) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह वळीवाच्या पावसाला सुरूवात झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याच्या घटना घडल्या. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ परिसरातील वीज पुरवठा बंद केला.
सोमवारी गोडोली येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शाळेवरील पत्रे उडून गेले. तर दुसऱ्या एका ठिकाणी दुचाकीवर झाड पडून दुचाकीचे नुकसान झाले. कंरजे येथे पावसामुळे घराची भिंत पडल्याची घटना घडली. तर काही घरावरील पत्रेही पावसामुळे उडून गेले. जिल्ह्याधिकारी कार्यालयाजवळ वादळी वाऱ्याने झाड पडले. पुष्कर मंगल कार्यालयानजिक उभारण्यात आलेले पत्राचे कूपंन पडल्याने मोठे नुकसान झाले.
दरम्यान, सदर बझार येथे केबीपी महाविद्यालयासमोर रस्त्यावर विजेच्या तारा तुटून लोबंकळत होत्या. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सातारा शहरात तसेच ग्रामीण भागात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सलग तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी ओढ्यांमध्ये पाणी वाहू लागले आहे.