बीड - येथील वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने साखर कारखाना वरून परतणाऱ्या ऊसतोड कामगारांना वाहतूक शाखेचे प्रमुख कैलास भारती यांनी मास्कचे वाटप केले.
गतवर्षी याच ऊसतोड कामगारांचे कोरोनाच्या संकट काळात प्रचंड हाल झाले होते. यंदा मात्र लॉकडाऊनच्या काळात पोलीस विभागाकडून ऊसतोड कामगारांची विशेष काळजी घेऊन त्यांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
बीड जिल्ह्यात आठ लाखाहून अधिक ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी पर राज्यात व जिल्ह्यात जातात. साखर कारखाने बंद होऊ लागलेले आहेत. ऊसतोड मजूर मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात परतत आहेत. अशा परिस्थितीतच कोरोनाने हाहाकार माजवला असल्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर बीड वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मोहीम राबवत बीड जिल्ह्यात परतणाऱ्या ऊसतोड मजुरांना मास्क चे वाटप केले जात आहे.
बुधवारी बीड जिल्ह्यात वाहतूक पोलीस विभागाचे प्रमुख कैलास भारती यांच्या पुढाकारातून बीड जिल्ह्यात परतणाऱ्या ऊसतोड मजुरांना मास्क वाटप करून त्यांना कोरोनापासून बचावासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात जनजागृती देखील केली जात आहे. याउलट गतवर्षी कोरोना संकट काळात ऊसतोड मजुरांची प्रचंड हेळसांड झाली होती. अनेक ऊसतोड मजुरांना भर उन्हाळ्यात गावाबाहेर ठेवण्यात आले होते. यंदा मात्र प्रशासनाकडून ऊसतोड मजुरांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यांना मास्क वाटप करून त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली जात आहे. बीड वाहतूक पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.