मुंबई- मुंबईसह महाराष्ट्रातील 75 हून अधिक मॉल्स 4 महिने झाले बंद आहेत. त्यामुळे याचा मोठा फटका मॉल उद्योगाला बसला आहे. आतापर्यंत या व्यवसायाला अंदाजे 1 लाख कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. तर लवकरात लवकर मॉल्स सुरू झाले नाही, तर ऑगस्टपासून याचे दुष्परिणाम दिसू लागतील, अशी भीती द शॉपिंग सेंटर असोसिएशन ऑफ इंडिया (एससीएआय) ने व्यक्त केली आहे.
असोसिएशननुसार मॉल्स सुरू न झाल्यास ऑगस्टमध्ये मॉल्समधील नोकऱ्या जाण्यास सुरुवात होईल आणि 50 लाख नोकऱ्या धोक्यात येतील. या पार्श्वभूमीवर असोसिएशनने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून राज्यातील मॉल्स सुरू करण्यास लवकरात लवकर परवानगी देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात 75 हून अधिक मॉल्स असून यातील 50 टक्के मॉल्स हे एकट्या मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) आहेत. तर त्यापाठोपाठ पुण्यात 20 टक्के मॉल्स आहेत. उर्वरित मॉल्स इतर जिल्ह्यात आहेत. हे सर्व मॉल्स मार्चपासून बंद आहेत. मॉल उद्योग हा मोठा आणि महत्वाचा उद्योग असून यावर अंदाजे 50 लाख लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. पण मागील 4 महिन्यापासून राज्यातील मॉल्स बंद आहेत. त्यामुळे या सर्व लोकांवर आता उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.
कारण आतापर्यंत मॉल्स उद्योगाचे लॉकडाऊनमुळे अंदाजे 1 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. आता यापुढे नुकसान सहन करण्याची ताकद या उद्योगात नाही. त्यामुळे शक्य तितक्या लवकर मॉल्स सुरू करावेत. अन्यथा हा उद्योग मरणावस्थेत जाईल, असे असोसिएशनचे अध्यक्ष अमिताभ तनेजा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, 8 जूनपासून देशातील इतर राज्यात मॉल्स सुरू करण्यात आले आहेत. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रातच मॉल्स का बंद आहेत, असा सवाल असोसिएशनने केला आहे. इतर राज्यात फिजिकल डिस्टन्सिंगसह इतर सर्व नियम पाळत मॉल्स सुरू आहेत. आम्ही देखील राज्यात सर्व नियम पाळू. त्यामुळे सर्व नियम-अटींसह मॉल्स सुरू करायला परवानगी देण्याची मागणी असोसिएशनने केली आहे.