लातूर : येथे 15 दिवसांच्या कडक लॉकडाऊनंतर जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार याकडे लातूरकरांचे लक्ष लागले होते. मात्र, लातूर महानगरपालिका हद्दीत आणखीन 15 दिवस लॉकडाऊन कायम राहणार आहे तर इतर तालुक्याच्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.
जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही वाढलीच आहे. विशेषतः लातूर शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महानगरपालिका हद्दीसह परिसरातील गावांमध्ये कडक लॉकडाऊन कायम राहणार आहे. तर, नगरपालिका आणि नगरपरिषद या ठिकाणी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. भाजीपाला आणि किराणा दुपारी 12 पर्यंत सुरू राहणार आहेत. तर 8 ऑगस्ट नंतर नगरपालिका आणि नगरपरिषद या ठिकाणी राज्य शासनाने लागू करण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. लातूर शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. शिवाय रॅपिड टेस्टलाही सुरुवात करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी आणि मनपाचे नगरसेवक आणि महापौर यांच्यात झालेल्या बैठकीत शहर हद्दीत लॉकडाऊन कायम राहणार आहे.
नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया
शहर हद्दीत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय होताच उलट- सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 15 दिवसांपूर्वी जनतेच्या आग्रहास्तव लॉकडाऊन करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढावली होती. तर, 15 दिवसांचा कालावधी संपताच पुन्हा 15 दिवस शहरात लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा काही पर्याय नाही. जिल्हा प्रशासनाचा चुकीचा निर्णय अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.