लंडन - भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर धक्कादायक सॅटेलाईट छायाचित्रे समोर येत आहेत. चीन गलवान नदीचा मार्ग बदलत असल्याचे या छायाचित्रांतून दिसत असल्याचे प्लॅनेट लॅब या सॅटेलाईटद्वारे छायाचित्रे काढणाऱ्या कंपनीने म्हटले आहे.
दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या तणावामुळे सीमेवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.गलवान खोऱ्यातील डोंगररांगामधून गलवान नदी वाहते. हा भाग भारत आणि चीनसाठीही रणनीतिकदृष्या महत्त्वाचा आहे. हा भाग भारताच्या हद्दीत येतो. मात्र, नुकतेच चीनने या भागावर आपला दावा सांगितला आहे. 'गलवान व्हॅलीत चीनकडून भूप्रदेशात बदल करण्यात येत आहे. खोऱ्यातील रस्ते मोठे करण्यात येत असून त्यामुळे नदीचा मार्गही बदलत आहे, असे प्लॅनेट लॅब या कंपनीने म्हटले आहे.
भारताने सीमा भागात रस्ते बांधकाम सुरु केल्यानंतर चीनकडूनही रस्ते बांधण्यात येत आहेत. 'चीनच्या रस्ते बांधकामामुळे नदीच्या प्रवाहात बदल होत आहेत, असे कॅलिफोर्नियातील इन्स्टिट्युट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधील ईस्ट एशिया नॉनप्रालिफरेशन प्रोग्रामचे संचालक जेफ्री लेविस यांनीही म्हटले.
भारत चीन नियंत्रण रेषेच्या दोन्ही बांजूनी मोठ्या प्रमाणात ट्रक उभ्या आहेत. मात्र, चीनच्या बाजूने ट्रकची संख्या जास्त आहे. भारताच्या बाजूने 30-40 आहेत तर चीनच्या बाजूने 100 ट्रक आहेत. मंगळवारी काढण्यात आलेल्या सॅटलाईट इमेजमध्ये अनेक खोदकाम यंत्रे गलवान नदीत आणि रस्त्यावर दिसून आली, असे लेविस म्हणाले.
5 मे ला पहिल्यांदा चीनी सैनिकांनी भारतीय भूमीत अतिक्रमण केले. तेव्हापासून राजनैतिक स्तरावर आणि लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. 15 जूनला रात्री दोन्ही सैनिकामध्ये हाणामारी झाली त्यात 20 भारतीय जवान शहीद झाले. चीनचेही जवानही मारले गेले. मात्र, त्यांनी माहिती जाहीर केली नाही. चीनचे 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.