अमरावती - शहरातील जुनी वस्ती बडनेरा येथील कंपासपुरा या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी शनिवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी केली. हा परिसर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झाला असून गेल्या चार दिवसात या भागात युवकांना कोरोनाची झपाट्याने लागण होत झाली आहे.
महानगरपालिकेच्यावतीने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सिल करण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांना आता आपल्या आरोग्याची अतिदक्षता घेणे गरजेचे आहे. कोरोनाची साखळी तोडणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करुन प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असेही यावेळी जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.
ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वसनाचा त्रास असल्यास, वृध्द आणि दिव्यांग व्यक्तींना काही त्रास असल्यास तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती शहर आरोग्य केंद्रांवरील वैद्यकिय अधिका-यांनी द्यावी. नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला देत सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच या प्रतिबंधित परिसरातील नागरीकांनी सामाजिक अंतराचे पालन करावे. यावेळी नागरिकांशी चर्चा करण्यात आली. या परिसरात महानगरपालिकेच्यावतीने सर्व आवश्यक पावले उचलली जात असल्याबद्दल सर्व उपस्थितांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
यावेळी महापालिका आयुक्तांनी नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले. नागरिकांच्या समस्या यावेळी जाणून घेण्यात आल्या. आरोग्य विभागांच्या पथकासोबत यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी संवाद साधला आणि त्यांना सुचित केले की, त्यांनी कोव्हीड - 19 साठी दिलेल्या सुचंनाचे तंतोतत पालन करावे. यावेळी सहाय्यक आयुक्त वैशाली मोटघरे, उपअभियंता तायडे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.