नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली परिसरातील सीमा वादानंतर भारत आणि चीनमधील संबध कमालीचे ताणले गेले आहेत. दोन्ही देशांकडून सीमेवर कडेकोट पहारा दिला जात असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्करी साधनसामुग्रीची जुळवाजूळव करण्यात येत आहे. दरम्यान, येत्या बुधवारी(24 जून) भारत आणि चीनच्या संरक्षण मंत्र्यांना एकमेकांच्या शेजारी बसण्याची वेळ रशियात येणार आहे.
चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंग आणि भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियात दुसऱ्या महायुद्धातील विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित विजयी परेडमध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी भारतातील तिन्ही सैन्यदलाची एक तुकडीही रशियाला दाखल झाली आहे. रशियाचे संरक्षण मंत्री सेर्गी शोईगूही या विजय दिवस परेडमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे तिन्ही नेते एकमेकांच्या शेजारी बसलेले असतील. त्यावेळी राजनाथ सिंह आणि फेंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मॉस्कोतील रेड स्केअर येथे 24 जूनला ही विजयी परेड आयोजित करण्यात आली आहे. भारत आणि चीनचे संरक्षण मंत्री एकमेकांशी बोलतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे, दोन्ही नेत्यांसाठी ही एक मोठी संधी आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये स्वतंत्र चर्चा होईल की नाही, याची माहिती मिळाली नाही. 23 तारखेला भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे ऑनलाईन आयोजित करण्यात आलेल्या आरआयसी या त्रिदस्यीय बैठकीत सहभाग घेणार आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमध्ये काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रशिया, चीन आणि भारत या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये ही चर्चा होणार आहे. चीन आणि भारत दोघांशी मैत्रिपूर्ण संबध असल्याने रशिया मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. अमेरिकेने भारत चीनमधील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करण्याची ऑफर दिली आहे. मात्र, दोन्ही देशांनी ती फेटाळून लावली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत रशिया आपले महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसून येण्याची शक्यता आहे.
15 जूनच्या रात्री सीमेवर भारत चीनच्या सैनिकांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये 20 भारतीय जवान शहिद झाले आहेत. त्यामुळे संपुर्ण भारतामध्ये चीनविरोधात द्वेष निर्माण झाला आहे. कोरोना परिस्थितीचा फायदा घेत चीनने शेजाऱ्यांविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे, अशी टीका अमेरिकेनेही केली आहे. या सर्व परिस्थितीचा सामना मोदी सरकार कसे करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.