मुंबई- नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मिसाळ यांच्या जागी नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बांगर हे 2008 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. युवा आणि धडाडीचे सनदी अधिकारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. या अगोदर बांगर हे अमरावतीचे जिल्हाधिकारी होते. त्यानंतर 14 महिने त्यांनी नागपूरचे आयुक्त म्हणून काम पाहिले. सध्या ते नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त आहेत.
अभिजित बांगर यांनी 14 महिन्याच्या कार्यकाळात नागपूरमधील कचरा आणि पाण्याची समस्या सोडवली असून, स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले. त्यानंतर त्यांची बदली वस्त्रोद्योग विभागाचे संचालक म्हणून झाली. मात्र त्यांनी पदभार स्विकारला नव्हता. शेवटी नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. आता त्यांची नवी मुंबईचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.