अहमदनगर- साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने शिर्डीत साजरा करण्यात येणारा श्री, साईसच्चरित पारायण सोहळा यावर्षी गोकुळाष्टमीच्या अगोदर श्रावण वद्य 1 पासून म्हणजेच, 4 ऑगस्ट पासून आयोजित करण्यास तदर्थ समितीने मान्यता दिली आहे. तथापि, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही उत्सव आभासी (Virtual) पद्धतीने साजरे करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने वारंवार गोकुळाष्टमी उत्सव साजरा करावा, अशी मागणी होत होती. गोकुळाष्टमी उत्सव हा पूर्वी शिर्डी येथे स्थानिक स्वरुपातच परंतु व्यापक प्रमाणात साजरा होत असल्याबाबतचा उल्लेख संस्थान प्रकाशित सन 1993 सालच्या श्री साईलीला या नियतकालिकात आला आहे. पूर्वापार होत असलेला गोकुळाष्टमी उत्सव आणि गेल्या 25 वर्षांपासून होत असलेला श्री. साईसच्चरित पारायण सोहळा हे योगायोगाने श्रावण या एकाच महिन्यात येतात. त्यामुळे पारायणाच्या आरंभाची तिथी पुढें सरकवल्यास पूर्वी व्यापक स्वरुपात स्थानिक पातळीवर होणारा गोकुळाष्टमी उत्सव आताही व्यापक स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे.
सध्या संपूर्ण भारतात कोविड 19 या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव असल्याने साईबाबांचे मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. ते दर्शनासाठी परत कधी सुरू होईल याची शाश्वती नाही. कोरोना विषाणू संसर्गामुळे गर्दी करण्यावर, गर्दीचे कार्यक्रम करण्यावर शासनामार्फत निर्बंध घालण्यात आलेले आहेत.
तसेच राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये अधिसुचना नर्गमित करण्यात आलेली आहे. अधिसूचनेचा कालावधी महाराष्ट्रात व अहमदनगर जिल्ह्यात 31 जुलै 2020 पर्यंत आहे. त्यामुळे चालू वर्षी सामुदायिकरित्या पारायण सोहळा आयोजित करता येणार नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही उत्सव आभासी (Virtual) पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. आता केवळ पारायण सोहळ्याचा आरंभ दिन पुढे सरकवून तो 4 ऑगस्ट रोजी सकाळी 7 ते 11 या वेळेत होणार आहे.