कोल्हापूर- मंगळवार (21 जुलै) रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी राज्यव्यापी दूध बंद आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला कोल्हापूर दूध उत्पादक संघ म्हणजेच, गोकुळने पाठिंबा दिला होता. एकवेळचे दूध संकलन बंद ठेवण्याचा गोकुळने निर्णय घेतला होता. याला विभागीय उपनिबंधकांनी आक्षेप घेत कारवाईचा इशारा दिल्यानंतर गोकुळने आपला निर्णय मागे घेतला असून उद्या संकलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी स्पष्ट केले आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी उद्या राज्यातील सर्व दूध संकलन बंद करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी बंदला पाठिंबा देत दूध बंद आंदोलन यशस्वी करू असे म्हटले आहे. दूध बंद आंदोलन हे जीएसटी मागे घ्यावा, राज्य सरकारने दूध उत्पादकांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान द्यावे, केंद्र सरकारने बफर स्टॉक करावा, निर्यात अनुदान 30 रुपये द्यावे यासह अन्य मागणीसाठी करण्यात येणार आहे. या आंदोलनात कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाने उडी घेत उद्या जिल्ह्यातील एक वेळचे दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर आक्षेप घेत प्रादेशिक दूध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयांतर्गत दूध विभागाच्या उपनिबंधकांनी नोटीस काढून संकलन सुरू ठेवण्याबाबतचा आदेश दिला होता. विभागाच्या उपनिबंधकांनी दिलेल्या आदेशानुसार गोकुळ दूध संघाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उद्याच्या आंदोलनाला दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे.
तसेच, गोकुळ दूध संघ संकलन सुरू ठेवणार असल्याचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान उद्याचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करू असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे.