ब्राझिलिया - ब्राझिलियन अॅमेझॉन जंगलांमधील आगींमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत जुलै महिन्यात 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. येथील स्थानिक अंतराळ संशोधन राष्ट्रीय संस्थेने ही माहिती दिली.
ब्राझीलमधील ही संस्था पर्यावरणीय घडामोडींवर ही नजर ठेवते. या संस्थेने यंदा जुलै महिन्यात ॲमेझॉन पर्जन्य जंगलांमध्ये 6 हजार 830 आगींची नोंद केली. 2019 मध्ये जुलै महिन्यात याच आगींची संख्या 5 हजार 318 होती. यामुळे येथील पर्यावरण अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात येथे 30 हजार 900 आगी लागल्याची नोंद संस्थेने केली होती. यंदा त्याहूनही अधिक आगी लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
एका बाजूला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी देशाच्या आर्थिक विकासासाठी ॲमेझॉनमधील जमीन स्वच्छ करण्याचे आदेश दिले होते. यादरम्यानच मोठ्या प्रमाणात आगी लागण्याच्या घटनांमुळे राष्ट्रांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सरकारने 16 जुलैला पॅन्टनल येथील दलदलीच्या जमिनी आणि अॅमेझॉन जंगले यांना पुढील चार महिने आगी लावण्याचे आदेश दिले आहेत. बोल्सोनारो यांनी ॲमेझॉनमधील पर्यावरणीय हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मे महिन्यात लष्करालाही पाचारण केले होते. मात्र, आगी रोखण्यासाठी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी सरकारचा प्रतिसाद फारसा चांगला नसल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, 2019 च्या तुलनेत यंदाचे वर्ष अधिक कोरडे असल्यामुळे यंदा आग लागण्याची शक्यता मागील वर्षाहून अधिक आहे, असे जर्मनी येथील अद्ययावत शाश्वत अभ्यास संस्थेतील एक वरिष्ठ तज्ज्ञ कार्लोस रिटल यांनी म्हटले आहे.