वर्धा- पावसाळा तोंडावर असून आर्वी तालुक्यात नोंदणी झालेला कापूस अजून खरेदी झाला नाही. शिल्लक राहिलेला हा कापूस येत्या 4 दिवसात खरेदी करण्याचे नियोजन करण्यासाठी जिनिंग संचालकांची भेट घेतली. यासह 2 हजार 700 शेतकाऱ्यांपैकी अजून 1 हजार 300 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी शिल्लक आहे, तो घ्यावा अशा सूचना पशुसंवर्धन तथा पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या आहेत.
आर्वी तालुक्यात 2 हजार 700 शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. एका जिनिंग मिलमध्ये खरेदी सुरू होती. मात्र मनुष्यबळ अभावी ती मंदावली. तसेच इतर जिनिंग कापूस खरेदी करण्यासाठी पुढे आल्या नाहीत. त्यामुळे अद्याप शेतकऱ्यांकडील कापूस शिल्लक आहे. यामुळे इतर जिनिंग संचालकांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यात आल्याचे सुनील केदार म्हणाले.
आर्वीतील निरंकार कॉटेक्स जिनिंग, जगदंबा जिनिंग अँड प्रेसिंग, गणेश नॅशनल जिनिंग अँड प्रेसिंग, जय श्री श्याम जिनिंग यांचा समावेश आहे. जिनिंगला भेट देऊन व्यवस्थापकांशी चर्चा केली. पावसाळा सुरू झाला असून शेतकऱ्यांकडील हंगामात बियाणे घेण्यासाठी त्याला कोणाच्या दारात जाण्याची वेळ येऊ नये. यासाठी अडचणीतून मार्ग काढून आपल्याला शेतकऱ्यांना मदत करायची आहे. आणि त्यासाठी जिनिंगच्या सहकार्याची आवश्यकता आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीत शासनाला सहकार्य करा. येत्या 4 दिवसात कापूस खरेदी होईल असे नियोजन करण्यास पालकमंत्री केदार यांनी व्यवस्थापकांना सांगितले आहे.
जिनिग मिल मालकांनी सुद्धा त्यांना कापूस खरेदी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्याची विनंती केली. यात प्रामुख्याने सरकी व बेल्स ठेवायला जागा कमी पडत असल्यामुळे सीसीआयने सरकी आणि बेल्स लवकर उचलाव्यात. तसेच मजुरांचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे, तो बाजार समितीने सोडवावा. बेल्स लवकर उचलण्यासाठी सीसीआयला सूचना दिल्यात. तसेच आर्वी बाजार समिती सचिव यांना मजुरांची उपलब्धता करून देण्याबाबत निर्देश दिल्याचे केदार यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार अमर काळे, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्याधर चव्हाण, आर्वी बाजार समिती सचिव कोटेवार आणि जिनिंग व्यवस्थापक उपस्थित होते.