मुंबई- राज्यातील महाविकास आघाडीत निर्णयांवरून सुरू असलेले मतभेद दिवसेंदिवस वाढतच आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या बदल्या रद्द करण्यावरून हे मतभेद अधिकच ताणले असल्याने ते मतभेद कमी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र त्यानंतरही आघाडीतील धुसफूस कायम असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नुकत्याच घेण्यात आलेल्या मुलाखतीकडे लक्ष लागले आहे.
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या युट्यूब चॅनेलसाठी पवारांची मुलाखत घेतली आहे. पवार हे या मुलाखतीत काय बोलणार आहेत, यावरून आघाडीतील नेमकी धुसफूस काय आहे? याचा उलगडा होईल असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.
राज्यात मागील काही महिन्यांपासून निर्णय प्रक्रियेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही शिवसेनेकडून डावलले जात असल्याने आघाडीत धुसफूस वाढली होती. त्यातच पारनेर येथील सेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीने फोडल्याने त्याची प्रतिक्रिया म्हणून मुख्यमंत्री कार्यालयातून मुंबईत 10 उपायुक्तांच्या करण्यात आलेल्या बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ठाम मत राष्ट्रवादीत बनले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यासाठीची नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत असताना आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही समन्वय ठेवायला हवा, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पारनेर येथील सेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीने पळवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली असल्याचे सांगण्यात येते.
विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी काँग्रेसला 4 जागा हव्या होत्या, त्यावर काँग्रेसचे अद्यापही समाधान होऊ शकले नाही. दोन आठवड्यांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान राज्यातील गोरगरीब जनतेसाठी न्याय योजना लागू करण्याची मागणी केली होती, त्यावरही अद्याप सकारात्मक पाऊल पडले नाही. तर दुसरीकडे अनेक निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला अजूनही डावलण्यात येत असल्याने काँग्रेसची नाराजी कायम आहे. त्याच पार्श्वभूमीवर पवारांच्या मुलाखतीत आघाडीतील धुसफूस काय आहे, याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठीचा दुजोराही शिवसेना नेते व खासदार राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला आहे.