नागपूर- विदर्भाचे पंढरपूर म्हणून जिल्ह्याच्या धापेवाड्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ओळखले जाते. आषाढी एकादशीनिमित्त विदर्भ, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात वारकरी आणि भाविक दर्शनासाठी येथे येतात. मात्र, यावर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता धापेवाडा येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थानातर्फे दरवर्षी आयोजित होत असलेल्या यात्रेचे आयोजन यावर्षी करण्यात येऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.
श्री क्षेत्र धापेवाडा येथे परिपाठ उत्सवाच्या कालावधीत दिंड्या व पालख्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होऊन भाविकांची गर्दी होते. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रसार व संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. शिवाय श्री क्षेत्र धापेवाडा हे स्थळ नागपूर शहर व संसर्ग प्रभावित ग्रामीण क्षेत्रापासून जवळ आहे. हे विचारात घेऊन आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने श्री क्षेत्र धापेवाडा येथे दिंडी व पालखी घेवून येण्यास, मंदिर तसेच परिसरात व गावामध्ये सवाद्य मिरवणूक काढणे, यात्रा, सामुहिक प्रार्थनेला मनाई करण्यात आली आहे. त्याकरिता मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.