मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकात नथूरामची भूमिका साकारल्यानंतर शरद पोंक्षे हे नाव अधिक परिचीत झाले. हे नाटक प्रदिप दळवी यांनी लिहिले होते. १९८९ मध्ये या नाटकाच्या प्रयोगाला शासनाने परवानगी दिली नव्हती. मात्र हे नाटक १९९७ मध्ये स्टोजवर आले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र केवळ १३ शोनंतर हे नाटक पुन्हा बंद पडले होते. दरम्यान अनेक कोर्टाच्या वाऱ्या केल्यानंतर २०११ मध्ये हे नाटक पुन्हा जोमाने सुरू झाले. शरद पोंक्षेनी यात मुख्य भूमिका साकारली आणि ते टीकेचे धनीही झाले. सुमारे ८१८ हून अधिक प्रयोगानंतर हे नाटक बंद करण्यात आले.
पोंक्षे सावरकरांच्या विचारसरणीने भारावलेले होते. या नाटकाचे पुनर्जीवन करण्याचा त्यांनी मनाशी पक्के ठरवले होते. त्यांनी 'हे राम , नथूराम' हे नवे नाटक स्वतः लिहिले आणि त्याचे प्रयोगही सुरू केले. नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग नाशिकमध्ये ५ ऑक्टोबर, २०१६ रोजी झाला. विरोध करणारे तर होतेच. त्यांनी नेहमी प्रमाणे विरोध केला, तरीही हे नाटक अजूनही सुरू आहे.
शरद पोंक्षे यांनी आपली भूमिका वारंवार प्रसार मध्यमातून मांडत नाटकाचे समर्थन केलंय. अलिकडे कमल हासन यांनी गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्यांनंतर त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. अशात आता शरद पोक्षेंनीही कमल हासन यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंदूं सहिष्णूवादी आहेत म्हणूनच असलं वक्तव्य खपवून घेतलं जात असं पोंक्षेंनी म्हटलं आहे. गेल्या काही वर्षात पोंक्षेंवर टीका करणारे आणि समर्थन करणारे यांच्यात नेहमीच वाद होत असतात. दरम्यान वेगवेगळ्या प्रसंगी पोंक्षेंनी केलेली विधाने चर्चेत राहिली आहेत आणि वादग्रस्तही ठरली आहेत.
इको-फ्रेंडली ईद साजरी करा - शरद पोंक्षे
मातीचे बोकड तयार करुन त्याला कापून इको-फ्रेंडली ईद साजरी करावी, असे मत शरद पोंक्षे यांनी मांडले होते. त्यानंतर त्यांच्या विधानावर बरेच राजकारण झाले. यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, 'मातीच्या बकरीचा बळी देऊन ईद साजरी करायची, मग माती खायची का ?'
पोंक्षेंचा शिवसेना प्रवेश
शरद पोंक्षे हे आरएसएसच्या विचारसरणीशी जवळीक असलेले होते. त्यामुळे ते भारतीय जनता पक्षाचे समर्थक असतील असा कयास बांधला जायचा. मात्र तीन वर्षापूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपने त्यांच्यावर टीका केली होती. अर्थात त्यांची नाटके जेव्हाही अडचणीत होती तेव्हा शिवसैनिकांनीच त्यांना पाठींबा देऊन सहकार्य केले होते.
शरद पोंक्षे संतापले आणि टीव्हीच्या चर्चेतून उठून निघून गेले...
'हे राम नथुराम' या नाटकावरून वर्षापूर्वी महाराष्ट्रभर वाद सुरू होता. हे नाटक व्हावं की न व्हावं या विषयावर टीव्ही चॅनलवर चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेदरम्यान नथुराम गोडसे यांची भूमिका साकारणारे शरद पोंक्षे यांचाही समावेश होता. ही चर्चा रंगात आलेली होती. त्याचवेळी अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी शरद पोंक्षे यांचा उल्लेख पोपट असा केल्यानं शरद पोंक्षे चांगलेच संतापले आणि चर्चेतून उठून निघून गेले. त्यांनी टीव्हीच्या कॅमरेमनला कॅमेराही बंद करण्यास सांगितला. तसंच इअरफोनही काढून टाकला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या चर्चेतून शरद पोंक्षे उठून गेले असले तरीही चर्चेत सहभागी झालेल्या सगळ्या मान्यवरांचं मत हेच होतं की नाटक झालं पाहिजे. त्यावर गदा यायला नको.