जोहान्सबर्ग - आयपीएल २०१९ मध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळणारा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस याला दक्षिण आफ्रिकेने वर्ल्डकपच्या संघात स्थान दिले आहे. दिल्लीकडून खराब कामगिरी केल्यानंतरही त्याला संघात स्थान दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संघातील गोलंदाज एनरिच नॉर्त्जे या दुखापत ग्रस्त खेळाडूच्या जागी त्याची निवड झाली आहे.
एनरिच नॉर्त्जे याची दुखापत बरी होण्यासाठी ६ ते ८ आठवड्यांचा कालावधी लागेल. त्याने आफ्रिकेच्या संघाकडून केवळ ४ एकदिवसीय सामने खेळले आहे. तसेच अचूक मारा आणि १५० किमीच्या वेगाने चेंडू फेकणे ही त्याची खासीयत आहे. त्यामुळे त्याला विश्वचषकाच्या संघात संधी देण्यात आली होती.
एनरिच नॉर्त्जेच्या जागी निवडण्यात आलेल्या ख्रिस मॉरिसची आयपीएलमधील कामगिरी फिकी होती. गोलंदाजी आणि फलंदाजीत तो फ्लॉप गेला. त्याने ९ सामन्यात १३ गडी बाद केले तर फलंदाजीत अवघ्या ३२ धावा केल्या. त्यातही ३ वेळा त्याला भोपळाही फोडता आला नाही.
दक्षिण आफ्रिका संघातील वेगवान गोलंदाज हे दुखापतीने त्रस्त आहे. एन्गिडी चा स्नायू दुखावला गेला आहे. रबाडाही जखमी आहे. डेल स्टेन खांद्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. स्टेनने आयपीएलमध्ये केवळ २ सामने खेळून बाहेर पडला आहे.