इंम्फाळ (मणिपूर) - राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मणिपूर राज्यातील राज्यसभेच्या दोन जागांवर निवडणूक होणार आहे. काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार या 1 जागेसाठी आमने सामने उभे आहेत. इतर पक्षांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. ही निवडणूक 26 मार्चलाच नियोजित होती. मात्र, कोरोना संकटामुळे निवडणूक आयोगाने आता जूनमध्ये निवडणूक घेण्याचे ठरवले आहे.
भाजपकडून लेसेंबा संजोबा तर काँग्रेसकडून टी. मंगी बाबू हे निवडणूक लढवत आहेत. नागा पिपल फ्रंटचे उमेदवार एच. कशुंक यांनी 18 मार्चलाच अर्ज मागे घेतला होता. याआधी ही जागा भाजपच्या के भाबंदा यांच्याकडे होती.
राज्यसभेच्या ५५ जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती. अर्ज मागे घेण्याची मुदत १८ मार्चला संपली. मुदत संपली त्यावेळी ५५ पैकी ३७ जागांसाठी प्रत्येकी १ उमेदवारी अर्ज आला होता तर १८ जागांसाठी एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आले होते. निवडणूक आयोगाने अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर ३७ जागांसाठी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले आणि १८ जागांसाठी निवडणूक जाहीर केली. ही निवडणूक २६ मार्चला होणार होती पण आता ही निवडणूक १८ जून रोजी होणार आहे.