मुंबई - कोरोनाला हरवण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रभावी लस तयार करण्याच्या मागे लागले आहेत. तर दुसरीकडे इतरही पर्यायी लसीचा विचार केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून वृद्धांना बीसीजी लस देण्यात येत असुन त्यावरील चाचणी सुरू आहेत. त्यानुसार केईएम रुग्णालयात आतापर्यंत 45 जणांना लस टोचण्यात आली आहे. तर अजूनही काही जणांना ही लस देण्यात येणार असून त्यांच्यावर पुढचे सहा महिने लक्ष ठेवण्यात येणार आहे. मात्र, प्रत्यक्ष ही लस वृद्धांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे का हे सिद्ध होण्यासाठी आठ महिने वाट पाहावी लागणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
कोरोनाचा सर्वाधिक धोका वृद्धांना म्हणजेच 60 वर्षांवरील नागरिकांना आहे हे याआधीच स्पष्ट झाले आहे. कारण कोरोनाग्रस्त आणि मृतांमध्ये 60 वर्षावरील नागरिकांचाच समावेश अधिक आहे. मुंबईतही सर्वाधिक मृत्यू हे 60 वर्षांवरील रुग्णांचे आहे. त्यामुळे आयसीएमआरसमोर वृद्धांना सुरक्षित करण्यासाठी काही चांगला उपाय शोधण्याचे आव्हान
होती. अशावेळी लहान मुलांना दिली जाणारी बीसीजी (Bacillus calmette guerin) वृद्धांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते का
याबाबत विचार करण्यात आला. मग त्यादृष्टीने आयसीएमआर कामाला लागले. त्यानुसार या लसीचा अभ्यास आणि मानवी चाचण्या घेण्याचा निर्णय झाला. 60 ते 72 वयोगटातील नागरिकांवर लसीची चाचणी करण्यासाठी देशातील मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, भोपाळ आणि जोधपूर अशा सहा शहरांची निवड करण्यात आली. या शहरातील एकूण 1450 जणांवर बीसीजी लसीची चाचणी करण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबईतुन यासाठी केईएम रुग्णालयाची निवड झाली आहे. आयसीएमआरच्या सूचनाप्रमाणे केईएमसह सहा देशातील केंद्रावर चाचणीला ऑगस्टमध्ये सुरुवात झाल्याची माहिती डॉ ऋजुता हाडाये, विभाग प्रमुख, पीएसएम (प्रिव्हेन्टिव्ह अँड सोशल मेडिसिन) यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
आतापर्यंत केईएममध्ये 45 जणांना लस टोचवण्यात आली आहे. तर या महिन्यांत आणखी काही जणांना लस देण्यात येणार आहे. दरम्यान जोधपूरमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 200 जणांना (स्वयंसेवक ) लस देण्यात आली आहे. आता महिन्याभरात 6 शहरात मिळून 1450 स्वयंसेवकांचा आकडा पूर्ण करण्यात येईल. तर या सर्व 1450 स्वयंसेवकांवर पुढचे सहा महिने लक्ष ठेवत त्यांच्यावर या लसीचा नेमका काय परिणाम होतो आहे याचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर मग ही लस उपयुक्त आहे का हे स्पष्ट होणार आहे. ही लस उपयुक्त ठरली तर मग पुढे ही लस उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र यासाठी अजून आपल्याला किमान आठ महिने वाट पाहावी लागणार आहे.
सध्या बीसीजी लस केवळ लहानग्यांसाठीच-तज्ज्ञ
बीसीजी लसीची चर्चा काही दिवसांपासून जोरात सुरू आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुळे. पवार यांनी नुकतीच पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी लस घेतली आहे. तर त्यांनी ही आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी लस घेतल्याचे सांगितले आहे. पण ही लस नेमकी कोणती हा प्रश्न उपस्थित होत असताना ही लस बीसीजी असल्याची जोरदार चर्चा आहे. तज्ज्ञांनी मात्र पवारांनी कोणती लस घेतली हे आपल्याला माहिती नाही. पण सध्या बीसीजी लस केवळ आणि केवळ नवजात बालकांनाच दिली जाते. त्यांच्यासाठीच ती उपलब्ध आहे असे स्पष्ट केले आहे. तर, आता कुठे कोरोनाच्या अनुषंगाने ही लस उपयुक्त आहे का यावर अभ्यास सुरू आहे असे म्हणत पवारांनी घेतलेली ती लस बीसीजी लस नसावी असे अप्रत्यक्ष सूचित केले आहे.
दरम्यान, जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता आणि प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. पल्लवी सपाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 70-72 वर्षापासून त्यांच्याकडे बीसीजी लसीकरण मोहीम सुरू असुन लहान मुलांना ही लस दिली जाते. ही लस टीबीसारख्या आजारापासून संरक्षण करते. तर काही ठिकाणी ही कर्करोगावरही परीणामकारक ठरताना दिसत आहे. पण ही लस आता तरी केवळ लहान मुलांनाच दिली जाते. बाकी कोरोना काळात ती वृद्धांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी किती उपयुक्त ठरते हे चाचणीचा अभ्यास झाल्यानंतरच समजेल असेही डॉ सपाळे यांनी स्पष्ट केले आहे.