मुंबई - विवेक ओबेरॉयने ऐश्वर्या राय बच्चनच्या खासगी आयुष्यावरचे मिम शेअर केल्यानंतर बराच मोठा वाद झाला. बॉलिवूडमधील अनेकांनी त्याच्यावर टीका केली. परंतु विवेकने आपले म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न केला. मामला महिला आयोगापर्यंत पोहोचला तरीही विवेकचा तोरा तसाच होता. अखेर भरपूर छी.. थू झाल्यावर त्याने हे मिम डिलीट करीत माफी मागितली आहे.
विवेक ओबेरॉयवर टीका करणारे राजकीय हेतुने करताहेत, असा दावा कालपर्यंत विवेक करीत होता. मात्र त्याला आजा घरचा आहेर मिळाला आहे. विवेकच्या पाठीशी नेहमी ठाम राहणाऱ्या अनुपम खेर यांनी त्याच्यावर सडकून टीका केली आहे. विवेकचे हे कृत्य लज्जास्पद असल्याचे अनुपम खेर यांनी म्हटलंय.
अनुपम खेर यांना 'वन डे' या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चमध्ये बोलत असताना विवेक बाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता.
अनुपम खेर यांच्यासोबत असलेल्या इशा गुप्तानेही विवेकला दुषणे देत धारेवर धरले. ती म्हणाली, ''तुम्ही यात थोडे जरी सहभागी असला तरीही, यातुन तुमची मानसिकता कळते. ही चांगली गोष्ट नाही. तो कसा आहे हेच यातून कळते. इतर कसे आहेत याच्याशी याचा काही संबंध नाही. ही लज्जास्पद गोष्ट आहे.''