मुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी (एनसीबी) पथकाच्या घाटकोपर युनिटने केलेल्या कारवाई दरम्यान 3 आरोपींना अटक करून तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मुंबईतील धारावी परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे.
याप्रकरणी, अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी रिजवान रहमत खान या 35 वर्षे आरोपीला अटक करून त्याच्या ताब्यातून 400 ग्राम एमडी व एक इलेक्ट्रॉनिक वजन मशीन जप्त केलेली आहे. याबरोबरच जब्बार अब्दुल सत्तार खान या 35 वर्षाच्या आरोपीला धारावीतील कुंभारवाडा येथून अटक केली. त्याच्याकडून 310 ग्राम एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे.
याबरोबरच धारावी परिसरातील मुस्लिम नगर झोपडपट्टी या ठिकाणी छापा मारून फकरुल्ला शेख (वय 36 वर्षे) आरोपीला अटक करून त्याच्या ताब्यातून 290 ग्राम एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे .या तिन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1 कोटी 20 लाख रुपये असल्याचा अमली पदार्थविरोधी पथकाचे म्हणणे आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.