अमरावती - भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान हुतात्मा झाले. यानंतर देशभरात चीन विरोधी लाट पसरली आहे. विश्व हिंदू परिषदेने चीनचा निषेध नोंदवित अमरावतीच्या राजकमल चौक येथे निदर्शने केली. यावेळी चिनी बनावटीच्या वस्तू जाळण्यात आल्या. तसेच चीनविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
गत काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. चीनकडून भारतात घुसखोरी केली जात असून, हा प्रकार भारत खपवून घेणार नाही. भारतीय सैन्य चिनी सैन्याला जशास तसे उत्तर देण्यात सक्षम असून, आता चीनला धडा शिकवायची वेळ आली आहे, अशा शब्दात विश्व हिंदू परिषदेने राजकमल चौक येथे घोषणाबाजी करीत चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा पुतळाही जाळला. आता प्रत्येक भारतीयांनी चिनी वस्तूंचा बहिष्कार करावा, असे आवाहन देखील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी नागरिकांना केले.
भारत-चीन सीमेवर हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांना यावेळी कार्यकर्त्यांनी दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. यावेळी परिषदेचे अध्यक्ष अनिल साहू यांच्यासह संतोष गहरवाल, बंटी परवानगी, नितीन गुप्ता, चेतन वाटकर, प्रविण गुल्हाने, अक्षय इंगळे, आतिश जगदाळे, हर्षल भाकरे ,गोपाल गायकवाड शरद मांडके हेमंत बेदरकार दुर्गेश ठाकुर सत्यजीत राठोड, कैलास परदेशी, आकाश पाली, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. विश्व हिंदू परिषदेच्या निदर्शनादरम्यान राजकमल चौकातील वाहतूक काही वेळासाठी खोळंबली होती.