कोल्हापूर: साडेतीन मुहुर्तांपैकी एक मूहुर्त म्हणजे गुढीपाडवा. त्यामुळे या या दिवशी सोने-चांदी, कपडे , इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल व इत्यादी वस्तू ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. मात्र अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, व्यवसाय बंद ठेवण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. याच पार्श्वभूमीवर दुकानं सुरू करण्याची परवानगी मिळावी, यासाठी आज कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि सर्वच संलग्न व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.
काय म्हटलंय निवेदनात?
चेंबर ऑफ कॉमर्सने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की व्यापाऱ्यांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 1 एप्रिल रोजी सणासुदीसाठी व दररोजच्या व्यवहारासाठी दुकानांमध्ये माल भरलेला आहे. जर सणाला दुकानामधून मालाची विक्री झाली नाही, तर व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तसेच, जीएसटीचे एप्रिल महिन्यातील 10 तारखेला मासिक रिटर्न तसेच त्रैमासिक रिटर्न भरण्याची मुदतही 20 एप्रिलला आहे. जर जीएसटीचे रिटर्न वेळेवर नाही भरले तर रिटर्नचे दंड व व्याज याचा फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांच्या कर्जाच्या बँकेचे व्याज व हप्ते हे वेळोवेळी नाही भरले तर संबंधित खाती NPA मध्ये जाऊन व्यापाऱ्यांचे क्रेडीट खराब होते. तसेच, व्यापारी वर्गाचे कामगार पगार, हॉटेल भाडे, लाईट बिल, पाणी बिल या गोष्टींचा खर्च चालूच आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक व मानसिक स्थिती कमकुवत होत आहे. तरी अत्यावश्यक व जीवनावश्यक प्रमाणे सर्व व्यापारी आस्थापने उघडण्यासाठी परवानगी मिळावी'.
वीकेंड लॉकडाऊनला हरकत नाही :
वीकेंड लॉकडाऊनला शनिवार आणि रविवारी कोल्हापुरातील सर्वच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यामध्ये एकही व्यवसाय, दुकान शहरामध्ये सुरू नव्हते. आमची विकेंड लॉकडाऊन काहीही हरकत नाही. मात्र, आता कुठे सर्व व्यापारी रुळावर येत असतानाच पुन्हा एकदा घालण्यात आलेले हे कडक निर्बंध आम्हाला अधिकच संकटात नेणारे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हंटले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात आता तरी दुकान उघडायला परवानगी द्यावी, असेही त्यांनी म्हंटले आहे.