सिंधुदुर्ग - अवघ्या चार दिवसापूर्वी सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीमध्ये मोठ्या गडगडाटासह धुव्वाधार पाऊस झाला होता. काही दिवसाच्या निरभ्र वातावरणानंतर आता पुन्हा हवामान खात्याने सिंधुदुर्गात 11 व 12 एप्रिल रोजी काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे बागायतदार पुन्हा एकदा धास्तावले आहेत. जिल्ह्यात अलीकडे बरेच वातावरणीय बदल पाहावयास मिळाले. उशिराने थंडी आली तरी फेब्रुवारीमध्येच तापमान वाढीला सुरुवात झाली होती.
जिल्ह्यात यंदा उच्चांकी तापमानाची नोंद
जिल्ह्यात यंदा उच्चांकी तापमान नोंदविले गेले होते; मात्र तापमान वाढीची एकीकडे जिल्ह्याला झळ सोसावी लागली असतानाच अचानक पावसाने हजेरी लावत सर्वांचीच दाणादाण उडवली. आंबोलीमध्ये वळीवाचा पाऊस कोसळला. यासह जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्लेचा काही भाग, सावंतवाडी परिसर, वैभववाडी, कणकवली येथे कमी व मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. बांदा परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली.
आंबा-काजू बागायतदार चिंतेत
जिल्ह्यात काजू व आंबा बागायतीचा अंतिम टप्प्यातील हंगाम सुरू आहे. अद्यापही काही ठिकाणी आंबा व काजू परिपक्व न झाल्याने ही फळे झाडावरच आहेत. अशा परिस्थितीत अचानक लावलेली पावसाने हजेरी ही बागायतदारांसाठी मात्र डोकेदुखी ठरली. त्यानंतर पुन्हा पाऊस होणार, अशी तिळमात्र कल्पना नसताना हवामान खात्याने जिल्ह्यात तुरळक व मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचे सुचित केले आहे. यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.
सध्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण
उन्हाचा पारा वाढत असल्याने घामाच्या धारा वाहत आहेत. त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. नागरिकांना मात्र हा पाऊस अधूनमधून गारवा देणारा ठरत आहे. जिल्ह्यातील आंबा व्यापारी, आंबा कॅनिंग परराज्यात, परजिल्ह्यात निर्यात करण्यासाठी व्यस्त असलेले दिसून येत आहेत. असे असताना आकाशात निर्माण होत असलेले पावसाचे ढग शेतकऱ्यांसाठी मात्र डोकेदुखीच बनले आहेत. सध्या जिल्ह्यात विविध ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.