हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील ग्रामपंचायतीच्या स्वच्छतागृहाचा धनादेश काढण्यासाठी 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना कळमनुरी पंचायत समितीच्या लेखाधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून या कारवाईने पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दत्तात्रय शिंदे असे लाचखोर लेखाधिकाऱ्याचे नाव आहे. कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात आले होते. बांधकामाचा 3 लाख 84 हजार रुपयांचा धनादेश पंचायत समितीच्या लेखा विभागाकडून मिळणार होता. हा धनादेश मिळवण्यासाठी मागील 5 ते 6 महिन्यांपासून ग्रामपंचायत पदाधिकारी लेखा विभागात चकरा मारत होते. धनादेश देण्यासंदर्भात अनेकदा विनंती देखील केली. मात्र लेखाधिकारी त्यांच्या विनवण्यांकडे दुर्लक्ष करत होता. शेवटी त्याने धनादेश देण्यासाठी 7 हजार रुपयांची लाच मागितली. परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने पदाधिकाऱ्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठून तक्रार दिली.
तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची शहानिशा केल्या नंतर आज लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक हनुमंत गायकवाड, पो.नि नितीन देशमुख, ममता अफूने स.पो.उ.नि बुरकुले यांनी पंचायत समिती परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास सापळा रचून शिंदे यास 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले.
या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात लाचखोर शिंदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना सारख्या महाभयंकर काळात प्रत्येक अधिकारी, कर्मचारी उत्कृष्ट कर्तव्य पार पाडत आहे. मात्र शिंदे सारख्या काही कर्मचाऱ्यांमुळे कार्यालयाची मान शरमेने झुकत आहे.