मुंबई - महानगरपालिका २०२० – २०२१ च्या सुधार समिती अध्यक्षपदासाठी ६ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी शिवसेनेकडून सदानंद परब, भाजपाकडून विनोद मिश्रा व काँग्रेस जावेद जुनेजा यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेकडून सदानंद परब यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. तर बेस्ट समितीसाठी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी अर्ज दाखल केला आहे.
शिवसेनेकडून सदानंद परब यांचा अर्ज भरताना सभागृह नेता विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव उपस्थित होते तर विनोद मिश्रा यांचे नामांकन दाखल करताना भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, जावेद जुनेजा यांचे नामांकन दाखल करताना विरोधी पक्षनेते रवी राजा हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच संबंधितांसह इतर नगरसेवक आणि नगरसेविकाही उपस्थित होत्या.महापालिका चिटणीस संगीता शर्मा यांच्याकडे सदर अर्ज देण्यात आले.
दरम्यान, बेस्ट समितीसाठी शिवसेनेने प्रवीण शिंदे यांना संधी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपाकडून प्रकाश गंगाधरे यांनी तर काँग्रेसकडून पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. महापालिकेतील समित्यांमधील पक्षीय बलाबल पाहता सत्ताधारी शिवसेनेचाच उमेदवार विजयी होऊ शकतो. मात्र एखाद्यावेळी भाजपाने काँग्रेस उमेदवाराला मतदान केल्यास सत्ताधारी शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आता ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.