कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात, असे अनेकदा दिसून येते. म्हणजे लोकांना चवदार, लज्जतदार खायला आवडते. मात्र ते ‘मीडियम स्पाइसी’ असायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते का? तसेच नात्यांसह विविध बाबींमध्ये आपण नेहमीच मध्यममार्ग म्हणजेच ‘‘मीडियम’ ला प्राधान्यक्रम देतो का? अशाच आवडी निवडी आणि सवयी बद्दल खुसखुशीत भाष्य करणाऱ्या लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरु होत आहे.
विधि कासलीवाल निर्मित ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्ध नाटककार मोहित टाकळकर मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. या चित्रपटातील कलाकारांची केमिस्ट्री सुद्धा अतिशय हटके असणार आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर, पर्ण पेठे आणि अभिनेता ललित प्रभाकर अशी हटके स्टारकास्ट ‘मीडियम स्पाइसी’ मध्ये आहे. ‘लव्ह सोनिया’, ‘डेट विथ सई’ नंतर सई एका वेगळ्या भूमिकेत दिसेल, ‘आनंदी गोपाळ’ मधून प्रेक्षकांची मने जिंकणारा ललित शहरी युवकाची व्यक्तीरेखा साकारणार आहे. पर्णचाही एक वेगळा अंदाज या चित्रपटात दिसणार आहे.
विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सने यापूर्वी वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. यामध्ये ‘सांगतो ऐका’, ‘वजनदार’, ‘रिंगण’, ‘गच्ची’, ‘रेडू’, ‘नशीबवान’, ‘पिप्सी’ अशा दर्जेदार चित्रपटांचा समावेश आहे. तर मोहित टाकळकर मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड भाषिक रंगभूमीवरील आघाडीचे नाव आहे, तसेच एक उत्तम संकलक म्हणूनही त्यांना चित्रपटसृष्टीत ओळखले जाते. यामुळे ‘मीडियम स्पाइसी’ बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे.
‘मीडियम स्पाइसी’ विषयी बोलताना निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या, ‘’आम्ही नेहमीच वेगळे विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहोत. ‘मीडियम स्पाइसी’ हा आपल्या आयुष्यातील विविध छटांचे वर्णन करतो. हे सर्व करत असताना, दिग्दर्शक मोहित टाकळकर यांनी नात्यांचा समतोल जपला आहे. चविष्ट जेवणानंतर आपल्या जिभेवर जी एक खास चव रेंगाळते, तसाच अनुभव ‘मीडियम स्पाइसी’ मधून प्रेक्षकांना मिळेल अशी आशा आहे.’’