पुणे - हिंजवडीमधील उच्चभ्रू वसाहतीतील कोरोनाबाधित महिलेने पुणे ते दुबई असा विमान प्रवास केला असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित महिला राहात असलेल्या सोसायटीधारकांनी हिंजवडी पोलिसांना पत्र दिले होते. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी सदर महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात उच्चभ्रू असलेल्या वसाहतीमध्ये एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. तिने स्वतः एका खासगी रुग्णालयात जाऊन टेस्ट केली. त्यात ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी महिलेला घरातच आयसोलेट होण्यास सांगितले होते. 11 जुलै ते 17 जुलैपर्यंत महिला घरातच होती. मात्र, शुक्रवारी संबंधित महिला सोसायटी धारकांचा विरोध झुगारून विमानाने पुण्याहून दुबईला आपल्या पतीकडे गेली.
हेही वाचा - व्याधीग्रस्त मुलीवर मांत्रिकाचे अघोरी उपचार, चप्पल तोंडात धरून गावभर फिरवले
महिलेवर गुन्हा दाखल...
पुणे ते दुबई असा विमान प्रवास केलल्या सदर कोरोनाबाधित महिलेवर हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटने प्रकरणी डॉ. अमित बाबासाहेब माने (33) यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली. साथ रोग प्रतिबंध कायद्यांतर्गत तिच्यावर सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या 30 वर्षीय महिलेला कोरोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. खासगी रुग्णालयात टेस्ट केली असता ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, लक्षण सौम्य असल्याने महिलेला घरातच क्वारंटाईन होण्यास डॉक्टरांनी सांगितले. नियमानुसार किमान 10 तर जास्तीत जास्त 14 दिवस सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीला क्वारंटाऊन राहणे आवश्यक आहे. मात्र, तसे न करता संबंधित महिलेने पुणे ते दुबई असा थेट प्रवास विमानाने केल्याचे उघड झाले.
महिला राहात असलेल्या सोसायटीधारकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून हिंजवडी पोलिसांना याची माहिती दिली. तसे पत्रच सोसायटी धारकांनी दिले होते. सोमवारी उशिरा हे पत्र वरिष्ठ अधिकारी यशवंत गवारी यांच्याकडे पोहचले. तर दुसरीकडे महानगरपालिकेला माहिती देण्यात आली असताना त्यांनी देखील या गंभीर घटनेची दखल घेतली. दरम्यान, त्या महिलेने केल्या विमानप्रवासातील तीच्या सह प्रवाशांचे, पिंपरी-चिंचवडमधून पुणे एअरपोर्टपर्यंत केलेला प्रवास या दरम्यान संपर्कात आलेल्या व्यक्तींचे काय, असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.