जैसलमेर (राजस्थान)- बेतिणा गावात काही अज्ञातांनी एका उंटणीला जबर मारहाण करून तिचा पाय तोडला. ही घटना चार दिवसा अगोदर घडली होती. मात्र, या घटनेकडे पशू विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे. तसेच, घटनेमुळे जिल्ह्यातील पशू प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
उंटणीला खूप क्रूरतेने मारहाण करण्यात आली असून ती गंभीर जखमी झाली आहे. याबाबत ग्रामस्थांनी पशू पालन विभागाला माहिती देखील दिली. मात्र विभागाने घटनास्थळावर जाऊन उंटणीला बघितले देखील नाही. विभाग उंटणीकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप पशू प्रेमी व उंट पालक सुमेरसिंह भाटी यांनी केला आहे.
तसेच, उंटाला राज्य पशूचा दर्जा आहे, मात्र त्याच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न केले जात नाही. वर्तमान काळात उंटाची काही खास गरज नाही, त्यामुळे पशू पालक उंटांचे संगोपन करत नाही. अशातच जर उंटांसोबत अशा मारहाणीच्या घटना होत राहिल्या व त्यांच्या संरक्षणार्थ योग्य पाऊले उचलण्यात आली नाहीत, तर ते विलुप्त होतील. त्यामुळे या जखमी उंटणीची मदत करावी, अशी मागणी भाटी यांनी केली आहे.
या प्रकरणी भाटी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना व पोलीस अधीक्षकांना निवेदन केले असून उंट पालकाला योग्य नुकसान भरपाई देणे, तसेच आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.