औरंगाबाद- कन्नड ग्रामीण रुग्णालयातील कोरोनाबाधित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 6 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 15 झाली आहे.
कन्नड ग्रामीण रुग्णालयातील कोविड 19 सेंटरमधील वॉर्डात नियुक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 20 जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 6 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. यात रुग्णालयातील 3 कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या नातेसंबधातील 3 असे 6 जण बाधित झाले आहेत.
प्रशासनाने आज म्हाडा कॉलनी, हिवरखेडा रोड लगत स्मशानभूमी समोरील परिसर, नंदनवन कॉलणी आदी परिसर प्रतिबंधित केला असल्याची माहिती नगरपरिषदच्या मुख्याधिकारी नंदा गायकवाड यांनी दिली आहे. तर, ग्रामीण रुग्णालयातील 3 कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्यांच्या लाळेचे नमुने आज घेण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार यांनी दिली आहे.
कोरोनाने कन्नड शहरात आपले पाश आवळायला सुरुवात केली असून सध्या 15 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देवगाव आणि कानडगाव येथे प्रत्येकी एकावर उपचार सुरू असल्याने कन्नड तालुक्यातील उपचार घेणाऱ्या बधितांची एकूण संख्या 17 पर्यंत पोहोचली आहे. आज जे 6 रुग्ण सापडले त्या ठिकाणी हे रुग्ण राहत होते. त्या ठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने निरजंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे.