जालना- जालन्यामध्ये कोरोनाबाधित मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काल रात्री उशिरा जालन्यातील अंबड रोडवर राहणारी श्रीनगर येथील 57 वर्षीय महिला कोरोनाची बळी ठरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मृत्यूंची संख्या 29 झाली आहे.
निमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब, असे विविध आजार असलेल्या या 57 वर्षीय महिलेला 4 जुलै रोजी कोविड 19 रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असतानाच काल महिलेचा अहवाल पॉझिटिव आला आणि त्यानंतर या महिलेची प्रकृती आणखीनच गंभीर झाली. यातच या महिलेचा मृत्यू झाला.
दरम्यान, जालना जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 29 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. तर 800 रुग्णांना कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढले होते. सध्या कोरणाची साखळी तोडण्यासाठी रविवारी मध्यरात्रीपासून जालन्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या संचारबंदीचा फायदा होतो किंवा नाही हे पुढील 2 दिवसानंतरच कळणार आहे. तुर्तास तरी संचार बंदीची कडकपणे अंमलबजावणी केल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे.