नागपूर - शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहराकरीता राज्य शासनाच्या कोट्यातून लसीचा साठा प्राप्त झाला आहे. यामुळे शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांच्या सुविधेकरीता एकूण ९६ केन्द्रांवर लसीकरण सुरू झाले आहे. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC) येथे २ केंद्रावर कोव्हॅक्सीन, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २ केंद्र व अ.भा. आर्युविज्ञान संस्था (AIMS) मध्ये ४ येथे कोव्हिशिल्ड याप्रमाणे एकुण ९६ शासकीय व मनपाच्या केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध होताच लसीकरण मोहिमेला गती प्राप्त झाली आहे. सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.
तसेच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तिंसाठी आता ६ केन्द्र सुरू आहेत. यामध्ये कोव्हॅक्सीन लसीकरण स्व. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केन्द्र, छाप्रु सर्वोदय मंडळ हॉल छाप्रुनगर सेंट्रल एव्हेन्यू व मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC) या ठिकाणी करण्यात येत आहे. त्याशिवाय पाचपावली सुतिकागृह रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर व आयसोलेशन रुग्णालय इमामवाडा येथे कोव्हिशिल्ड लसीकरण करण्यात येईल.
विशेष म्हणजे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाइन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे, त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.