नागपूर- नागपुरात पुन्हा कोरोना रुग्ण संख्येने उच्चांक गाठला आहे. एकाच दिवसात तब्बल ३०५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने धोका अजूनही टळला नसल्याचेच अधोरेखित झाले आहे. या संपूर्ण आठवड्याभरात नागपुरातील कोरोना रुग्ण संख्या हजाराच्या घरात जाऊन पोहोचली आहे.
आज तब्बल ३०५ रुग्णांची नोंद झाल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ हजार ७९२ इतकी झाली आहे. यामध्ये १०७ रुग्ण हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत. पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित होते तेव्हा त्यांना प्रसासनाने आधीच इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले होते, त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आज ३७९ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ हजार ६९ इतकी झाली आहे.
शिवाय आज पुन्हा ११ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत नागपुरात एकूण १०७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, १०७ पैकी ८२ मृत्यू हे नागपूर जिल्ह्यातील आहेत, तर २५ मृत्यू हे नागपूर जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे आहेत. यामध्ये अमरावती आणि अकोला येथील कोरोनामुळे नागपुरात मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.
सध्या नागपुरातील ७ ठिकाणी १ हजार ६१६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (मेयो) ३७८ तर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (मेडीकल) २९७, एम्समध्ये ४०, कामठी येथील मिलिटरी रुग्णालयात ९ आणि खासगी रुग्णालयात ४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मध्यवर्ती कारागृहात तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ३९ आणि आमदार निवासमध्ये ४ रुग्णांवर, तर व्हीएनआयटी कोविड केअर सेंटरमध्ये १२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपुरात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६४.४ टक्के इतके आहे, तर मृत्यू दर हा २.२३ इतका झाला आहे.