जालना- जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेले 3, तसेच एका कोरोना संशयित महिला रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या ही आता 25 वर जाऊन पोहोचली आहे. एकाच दिवशी 4 रुग्ण दगावल्याने जिल्हा प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आज शहरातील गुरुगोविंदसिंगनगरमधील 50 वर्षीय व्यक्तीचा आणि गांधीनगरमधील 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तिसरा मृत्यू नाथबाबा गल्ली येथील 62 वर्षीय व्यक्तीचा आहे, तर चौथा मृत्यू हा जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील महिलेचा असून तिला आज सकाळी जालन्यातील कोविड रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. उपचार घेत असताना या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.
महिलेच्या संपर्कातील नातेवाईक यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. आणि या महिलेमध्ये देखील कोरोनाची लक्षणे होती म्हणून तिला जालन्यातील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान या महिलेचे लाळेचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. हा मृत्यू कोरोनामुळे झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मध्यरात्रीपासून दहा दिवसांची संचारबंदी
जिल्ह्यामध्ये विशेष करून जालना शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आज मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. आत्तापर्यंत लागू केलेल्या संचारबंदीपेक्षा ही संचारबंदी कडक करण्यात येणार असल्यामुळे जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यासाठी वारंवार बैठका घेत आहेत. आणि हा शेवटचा प्रयत्न असणार आहे, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.