गडचिरोली- जिल्ह्यात आज केंद्रीय राखीव दलाच्या 11 जवानांसह अन्य 3 जण, असे एकूण 14 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 11 कोरोनाबाधित जवानांमध्ये गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयात विलगीकरणात असलेल्या सीआरपीएफ बटालियन क्रमांक 113 चे 9 व अहेरी येथील 2 जवानांचा समावेश आहे. शिवाय, अहेरी येथील विलगीकरणात असलेला एक आणि गडचिरोली येथील 2 जण, असे एकूण 14 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अहेरी येथे पॉझिटिव्ह आढळलेल्या अन्य नागरिकांमध्ये 32 वर्षीय युवकाचा समावेश आहे. तो नांदेड येथून नोकरीत रुजू होण्यासाठी आला होता. तो विलगीकरण कक्षात होता. गडचिरोली येथील इतर 2 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये गुजरातहून परतलेली 65 वर्षीय महिला व मुंबईहून परतलेल्या 27 वर्षीय युवकाचा समावेश आहे. दोघांनाही गडचिरोली येथे समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.
आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 138 वर पोहोचला आहे, तर 63 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 74 झाली आहे. सद्य:स्थितीत 83 रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. यात 9 रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.