रायगड- जिल्ह्यात आज दिवसभरात सर्वाधीक 234 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीत सर्वाधिक 131 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्रात कोरोनाची वाढती संख्या ही एक डोकेदुखी ठरली आहे. त्यादृष्टीने पनवेल कृषी उत्पन्न समिती आणि मच्छीमार्केट बंद ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. आज दिवसभरात 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढलेला आकडा हा आजपर्यंतचा सर्वाधिक आहे. आतापर्यत जिल्ह्यात 3 हजार 683 कोरोनाबाधित रुग्ण संख्या असून 133 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 2 हजार 195 जणांनी कोरोनावर मात केली असून सद्यस्थितीत 1 हजार 355 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पनवेल महानगरपालिका आणि ग्रामीण पनवेलमध्ये रोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून आज शंभरी पार झाली आहे. त्यामुळे पनवेलमध्ये गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा निर्णय पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी घेतला आहे.
तर ग्रामीण रायगडातही कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या ही रायगडकरासाठी डोकेदुखी ठरत आहे. आज पनवेल शहरात 131, पनवेल ग्रामीण 50, उरण 5, खालापूर 7, कर्जत 5, पेण 9, अलिबाग 4, मुरूड 2, माणगाव 11, तळा 1, रोहा 4, श्रीवर्धन 2, महाड 1, पोलादपूर 2 असे एकूण 234 कोरोनाबाधित आढळले आहेत.