अमरावती - हॉलिक्रॉस शाळा प्रशासनाने शुल्क वसूलीसाठी ऐन परीक्षेच्या दिवशी शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थिनींना परीक्षेपासून वंचीत ठेवण्याचा प्रकार केला आहे. तसेच विद्यार्थीनींना दिवसभर मुख्याध्यापकांच्या कार्यालयासमोर उभे ठेवले. त्यामुळे पालकांनी रोष व्यक्त करत, हॉलिक्रॉस इंग्रजी शाळेवर कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
हॉलिक्रॉस शाळा प्रशासनाने शुल्क वसूलिसाठी रुबिन अॅप्सद्वारे संदेश पाठवून ऐन परीक्षेच्या दिवशी शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थिनींना परीक्षेपासून वंचित ठेवले. शाळा प्रशासनाने काही ठराविक विद्यार्थिनींना टार्गेट करून शुल्काचे कारण सांगून वर्गाबाहेर काढल्याचा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीने केला आहे. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अशा जाहिराती देऊन एकीकडे सरकार मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करत असताना, हॉलिक्रॉस इंग्रजी शाळेने शासनाच्या अभियानाची खिल्ली उडवल्याचा आरोप पालकांनी केला. या शाळेवर जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली. या आंदोलनात सिद्धार्थ वानखडे, वसंत गवई, समाधान वानखडे, राम पाटील, कैलास मोरे, गजानन वानखडे, सविता भटकर, अनिल खंडारे आदी सहभागी झालेत.