नवी दिल्ली - देशात पेटीएम, झोमॅटोसह विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरताना गुरुवारी सायकांळी अडथळा आला. इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अकामाई टेक्नॉलॉजीमध्ये तांत्रिक त्रुटी आली होती. त्याचा इंटरनेट सेवेवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे.
अकामाई टेक्नॉलॉजीने गुरुवारी रात्री १० वाजता ट्विट करत इंटरनेट सेवेमधील अडथळ्यांबाबत स्पष्टीकरण दिले. कंपनीने ट्विटमध्ये म्हटले, तांत्रिक प्रश्न कसा निर्माण झाला, याचा सातत्याने तपास सुरू आहे. मात्र, कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर कोणताही सायबर हल्ला नाही, असेही स्पष्ट केले आहे.
कंपनीने गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजता ट्विट करत इंटरनेट सेवा पूर्ववत झाल्याचे म्हटले आहे. तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आली आहे. सर्व परिस्थितीवर देखरेख करत आहोत. त्याचा परिणाम पूर्णपणे दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पेटीएमनेही ट्विट करत अकामाईच्या त्रुटीमुळे सेवांमध्ये अडथळा येत असल्याचे म्हटले. तर सर्व सेवा ऑनलाईन व पूर्वीसारख्या सुरू झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. झोमॅटोनेही सेवा पूर्ववत सुरू झाल्याचे ट्विट केले.
गेल्या महिन्यातही इंटरनेट सेवेत अडथळा
अनेक वापरकर्त्यांना इंटरनेट सेवेत अडथळा येत असल्याची नोंद डाऊनडिटेक्टर वेबसाईटने केली आहे. गेल्या महिन्यात जगभरातील वेबसाईट काही वेळासाठी बंद पडल्या होत्या.