हैदराबाद - (तेलंगाणा) - पर्यटकांकरिता आनंदाची बातमी आहे. रामोजी फिल्म सिटी 8 ऑक्टोबरपासून पर्यटनाचा आनंद घेण्याकरिता खुली होणार आहे. जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी अशी ओळख असलेली रामोजी फिल्म सिटी 2 हजार एकरांमध्ये आहे. दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना, परिपूर्ण हॉलिडे पॅकेज आणि विश्रांतीची ठिकाणे (leisure destination) असल्याने येथील सहल ही आनंदी आणि सुरक्षित असण्याची खात्री देते.
रामोजी फिल्म सिटी ही तब्बल 2 हजार एकरांवर पसरलेली आहे. ही सिने-जादूची (CINE MAGIC) अद्भूत व मनाला मोहित करणारी नगरी आहे. आकर्षक गार्डन, रंगीबेरंगी कारंजे यासह कल्पक असे विविधांगी मनोरंजन याठिकाणी अनुभवता येणार आहे.
भारतामधीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली रामोजी फिल्म सिटी देशातील एक अनोखे मनोरंजनाचे आणि पर्यटनाचे ठिकाण आहे. येथील परिपूर्ण सुविधांना तांत्रिक, वास्तूकला आणि आखीव-रेखीव रचनेची जोड मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांद्वारे ही रचना करण्यात आलेली आहे.
रामोजी फिल्म सिटी हे अनेक चित्रपटांच्या शूटिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे. सर्वसमावेशक चित्रपट निर्मितीच्या पायाभूत आणि व्यावसायिक सेवा येथे एकत्रितपणे देण्यात येतात. पूर्ण आणि तणावमुक्तीने चित्रपटनिर्मितीचा अनुभव येथे घेता येतो. शूटिंगदरम्यान हव्या असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. एकाचवेळी अनेक चित्रपटांचे शूटिंग करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. रामोजी फिल्म सिटी हे पर्यटकांना एक चुंबकीय आकर्षणासारखे आहे. प्रतिवर्षी सुमारे 1.5 दशलक्ष पर्यटक येथे भेट देतात. अविस्मरणीय अनुभव आणि वैविध्यपूर्ण विषयांवर आधारित मनोरंजनासाठी रामोजी फिल्म सिटी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.
हेही वाचा-'साहो'चं नवं पोस्टर प्रदर्शित, श्रद्धा-प्रभासचा रोमँटीक अंदाज
रामोजी फिल्म सिटीमधील काही आकर्षणे आणि प्रेक्षणीय स्थळांवर नजर टाकू...
युरेका -
शाही मध्ययुगीन किल्ल्यांच्या धर्तीवर युरेका बनविण्यात आली आहे. नृत्य-गीतांचे कार्यक्रम, लहान मुलांसाठी खेळण्याचे कोर्ट, रेस्टॉरंट, थीम बाजार युरेकामध्ये समाविष्ट आहेत. डोळ्यांच्या पापण्या न लवतात तोच वेगवेगळ्या युगात भटकायला मिळते. किल्ल्यांवर असतात तसे मनोरंजक बुरुज आपल्याला मोगलांची भव्यता अनुभवण्यास मोहित करतात. येथे तुम्हाला मौर्यांचे वैभव आणि अमेरिकन वाइल्ड वेस्टचे मनमोहक आकर्षणही अनुभवता येते. नृत्य आणि गाण्याची मैफल, प्ले कोर्ट, वेगवेगळ्या थीमवर आधारित रेस्टॉरंट्स यासह मध्ययुगीन मीना बाजारात खरेदीचा इथे मनसोक्त आनंद घेता येतो.
फंडुस्तान आणि बोरासुरा -
विशेषकरून लहान मुलांसाठी फंडुस्तान आणि बोरासुरा यांची रचना करण्यात आली आहे. तरुणांची विचार करण्याची प्रचंड क्षमता आणि त्यांच्यातील अपार ऊर्जा यांचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रवेश केला, की सुरू होतो थरार, राइड्स आणि विविध खेळांचा मनोरंजक प्रवास! बोरासुरा - लहान मुलांसाठी हा एक धडकी भरवणारा मात्र रोमांचक अनुभव आहे. ही एकप्रकारची जादुई गुहा आहे. आपण या गुहेत जसजसे पुढे जाल, तसे रहस्यमय चक्रव्यूह भासते. आपल्याला धडकी भरवणाऱ्या प्रतिमा आणि भयानक आवाजांचा थरारक अनुभव मिळतो. येथील रहस्यपूर्ण गोष्टींच्या अनुभवातून तुमच्या अंगावर शहारे येतील. या काळ्याकुट्ट गुहेत पुढे काय येईल याची तुम्हाला जरासुद्धा कल्पना नसते... त्यामुळे जरा जपूनच पावले टाका!
रामोजी मुव्ही मॅजिक -
रामोजी मुव्ही मॅजिकद्वारे फिल्म आणि फॅन्टसी यांची ओळख करून दिली जाते. चित्रपट निर्मितीतील गुंतागुंत, स्पेशल इफेक्ट, एडिटिंग, डबिंग आदींची ओळख करून दिली जाते. फिल्मी दुनियेत कल्पनाविश्वातील सफर घडवली जाते.
रामोजी स्पेस यात्रा -
अवकाशातील सफर घेण्याचा आनंद या ठिकाणी मिळतो. येथे तुम्ही अंतराळ यानात बसून आकाशगंगेची सफर करू शकता. चित्रपट निर्मितीमधील अॅक्शनचा स्वतः अनुभव घेता येतो. या संवादात्मक शोमधून तुम्हाला चित्रपट निर्मितीच्या उत्तम टिप्स मिळतात. येथील 'फिल्मी दुनिया' मध्ये तुम्ही कल्पनारम्य डार्क राईडचा अनुभव घेता येतो. अल्लाद्दीनचा राजवाडा आणि तेथील चमत्कारी विश्व पाहून तुम्ही आश्चर्यचिकत होता.
लाइव्ह शो -
विविधरंगी लाइव्ह शो हे रामोजी फिल्म सिटीचे आकर्षण आहे. विविध कलाकार आपल्या सादरीकरणातून देशातील सांस्कृतिक वैविधता दर्शवितात. ६०च्या दशकातील हॉलिवूड काऊबॉयप्रमाणे वाइल्ड वेस्ट स्टंट शो पाहायला मिळतात. तर बॅकलाइट शोच्या माध्यमातून प्रतिभाशाली कलाकारांचे परफॉर्मन्स अॅनिमेशन स्वरूपात दाखवले जातात. रामोजी फिल्म सिटीमधील रंगीबेरंगी मनोरंजनाच्या विविधांगी कार्यक्रमांचा अनुभव घेता येतो. येथील अद्भुत लय आणि तालबद्ध नृत्याचे लाईव्ह शो पाहताना तुमचेही पाय आपोआप थिरकतात. थरारक वाइल्ड वेस्ट शो आणि अनोख्या पोषाखातील ब्लॅकलाइट शो यांचा अनोखा संगम तुम्हाला अद्भुत असा अनुभव देतो.
गाइडेड टूर -
रामोजी फिल्म सिटी पाहताना पर्यटकांसाठी विशेष कोच प्रदान करणारी ही सुविधा आहे. चित्रपटांचे सेट्स, ठिकाणे व विविध गार्डन्स आदी सुविधांचे हो कोच पर्यटकांसाठी विशेष आहेत. सिनेमाची जादू, विविध रुपकात्मक आकर्षणे, करमणूक, राईड, गेम्स, लाइव्ह शो, मुलांसाठी खास आकर्षणे, इको टूर यांचा अनुभव यामध्ये घेता येतो. यावेळी असंख्य विदेशी प्रजाती असलेल्या अकल्पित फुलपाखरू उद्यानाला नक्की भेट द्या.
विंग बर्ड पार्क -
पंख - जगातील विविध प्रकारचे पक्षी येथे पाहायला मिळतात. नैसर्गिक निवारा, हिरवी पाने, पिंजरे असा नजारा येथे तुम्ही पाहू शकतो. पाण्यातील पक्षांचा विभाग, पिंजऱ्यातील पक्षांचा विभाग, मोकळ्या हवेतील पक्षांचा विभाग आणि शहामृग असे ४ विभाग दिसून येतात. येथील हिरव्यागार छताखाली असलेल्या 'बर्ड पार्क'मध्ये विविध खंडातील लक्षवेधी पक्षी आपल्याला पाहायला मिळतील.
हेही वाचा-हैदराबादेतील रामोजी फिल्म सिटीची तेलंगाणा पर्यटन पुरस्कारासाठी निवड
साहस - रामोजी अॅडव्हेंचर लँड -
विविध वयोगटातील पर्यटकांना साहसी अनुभव देण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. साहसमध्ये हाय रोप कोर्स, नेट कोर्स, एटीव्ही राइड्स, माउंटेन बाइक, पेन्टबॉल, टार्गेट शूटिंग आदी क्रीडाप्रकार सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून समाविष्ट केली गेली आहेत. याचा आनंद केवळ तरूणच नाही, तर सहकुटुंब, विविध ग्रुप्स, शाळा-कॉलेज, कॉर्पोरेट्स सर्वच जण घेऊ शकतात. 'साहस'मध्ये खराखुरा थरार अनुभवता येतो. 'साहस'ला भेट म्हणजे आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट साहसी अनुभव. सर्वच वयोगटासाठी मनोरंजनासह साहसाचा अनुभव देणाऱ्या अनेक गोष्टी येथे उपलब्ध आहेत.
हेही वाचा-रामोजी फिल्म सिटीतील मणीरत्मच्या सेटवर ऐश्वर्या राय दाखल
राहण्याची व्यवस्था -
रामोजी फिल्म सिटी संपूर्ण अनुभवण्यासाठी एक दिवस पुरेसा नाही. प्रत्येक आकर्षणाला तुम्हाला बराच अवधी द्यावा लागेल. तसेच निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव निराळाच येतो. प्रत्येकाला अनुरूप आणि माफक दरात राहण्याची पॅकेजेस येथे उपलब्ध आहेत. रामोजी फिल्म सिटीमधील हॉटेलमध्ये लक्झरी हॉटेल सितारा, सेमी-लक्झरी हॉटेल तारा, वसुंधरा व्हिला फार्म हाऊस यासह शांतीनिकेतन, सहारा आणि ग्रीन्स इनमध्ये सुपर इकॉनॉमी शयनगृहे आहेत. प्रत्येकजण त्यांच्या सोयीनुसार हे पॅकेज निवडू शकतो
कोव्हिड-१९ विषयीची खबरदारी -
स्वच्छता आणि सुरक्षिततेला येथे प्राथमिकता देण्यात आली आहे. सर्व ठिकाणी कोविड-१९ साठीच्या सुरक्षा खबरदारीसह पर्यटकांसाठी ही सुरक्षित सहल असेल. स्वच्छता आणि सुरक्षेसाठीचे काटेकोर पालन येथे करण्यात येते. योग्य सोशल डिस्टन्सिंग राहील याची खबरदारी घेतली जाते. संपर्कात येणाऱ्या सर्व साधनांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केले जाते. सुरक्षा प्रक्रियेचे प्रशिक्षण असलेले कर्मचारी हे पर्यटकांना मार्गदर्शन करतात.
हेही वाचा-आरआरआर : रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरू आहे क्लयमॅक्सचे शूटिंग
रामोजी फिल्म सिटीला यंदाचा तेलंगाणा पर्यटन पुरस्कार जाहीर-
देशभरातील पर्यटकांना भुरळ घालणारे रामोजी फिल्म सिटीची यंदाच्या तेलंगाणा पर्यटन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. रामोजी फिल्म सिटीसह पंचतारांकित हॉटेल डीलक्स श्रेणीमध्ये वेस्टीन हॉटेल आणि बंजारा हिल्समधील हॉटेल पार्क हयात यांना तेलंगाणा पर्यटन पुरस्कार मिळणार आहे. त्याचप्रमाणे गोलकोंडा रिसॉर्टनेदेखील पंचतारांकित हॉटेल श्रेणीत क्रमांक पटकाविला आहे. याव्यतिरिक्त फोर स्टार हॉटेल श्रेणीत दासपल्ला हॉटेल आणि मृगवनी रिसॉर्ट यांना पुरस्कार दिला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही ramojifilmcity.com वर किंवा टोल फ्री क्रमांक 1800 120 2999 वर संपर्क साधू शकता.