पणजी- गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी गोव्यात सभा घ्यायला सुरुवात केली आहे. अरविंद केजरीवाल अमित शहा राहुल गांधी संजय राऊत आदित्य ठाकरे यासारखे बडे नेते गोव्यात प्रचारात सक्रिय होत आहेत. मात्र महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारणारे हे सर्व पक्ष गोवा विधानसभा निवडणुकीत महिलांना उचित स्थान द्यायला विसरले असल्याचे चित्र समोर आल आहे. सर्वच पक्षांनी केवळ दोन ते अडीच टक्के उमेदवारी महिलांना दिली आहे.
गोव्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात एकूण 11,56,460 मतदार आहेत. त्यात महिला मतदार 5,93,960 असून पुरुष मतदार 5,62,500 आहेत. म्हणजेच पुरुषांच्या तुलनेत 31,460 महिला मतदार जास्त आहेत. असे असतानाही महिलांना अत्यंत कमी उमेदवारी देण्यात आली आहे.
जिंकण्याची क्षमता हाच निकष - अनिल लाड
गोव्यामध्ये सर्वच पक्षांनी निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने तयारी केली असून जिंकून येणारा उमेदवार देणे इतकीच त्यांची मानसिकता आहे. ज्या पक्षांनी महिला उमेदवारांना तिकीट दिले आहे. त्यातील कित्येक महिलांच्या पतीचे मतदारसंघात वजन असल्यानेच तिकीट दिले असल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार अनिल लाड यांनी केला आहे. महिला राजकारणात असल्या तरी त्यांना योग्य प्रतिनिधित्व विधानसभेत देण्याबाबत गोव्यातील कोणत्याच पक्षाला सोयरसुतक नसल्याचं लाड यांनी सांगितले.
सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने ४० जागावर आपले उमेदवार उभे केले आहेत. यापैकी केवळ ३ महिला उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. काँग्रेसने 37 जागा लढविण्याचा निर्धार केला आहे तर त्यांच्या गोवा फॉरवर्ड पार्टी या सरकारी पक्षाने ३ जागा लढवल्या आहेत. मात्र, काँग्रेसने केवळ २ महिलांना उमेदवारी दिली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने 39 जागा लढवल्या आहेत या पैकी ३ जागांवर त्यांनी महिलांना प्रतिनिधित्व दिले आहे. ममता बॅनर्जी यांच्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाने 26 जागा लढवल्या आहेत तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं तुळशी आघाडी करत येणार जागा लढवल्या आहेत. पण तृणमूल काँग्रेसने ४ महिलांना उमेदवारी दिली आहे. जी सर्वाधिक आहे. तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने एकाही महिलेला उमेदवारी दिलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने गोव्यात युती केली असून राष्ट्रवादी काँग्रेस 13 जागांवर तर शिवसेना नऊ जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र महाराष्ट्रात महिलांचा पुरस्कार करणाऱ्या आघाडीने गोव्यामध्ये एकाही महिलेला प्रतिनिधित्व दिलेला नाही.
टॅली काय सांगते
२००२ मध्ये राजकीय पक्षांनी ११ महिलांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी केवळ एकच महिला निवडून आली होती. २००७ मध्ये १४ महिलांना आणि २०१२ मध्ये १० महिलांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी प्रत्येकी १ महिला निवडून आली होती. २०१७ चा विचार केला तर १९ महिलांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यात केवळ २ महिला निवडून आल्या होत्या.