कोलकाता : पश्चिम बंगाल भाजपाचे प्रमुख दिलीप घोष यांनी काही दिवसांपूर्वी ममतांवर टिप्पणी केली होती. यानंतर आता त्याबाबत सारवासारव करताना घोष यांनी पुन्हा असेच अजब वक्तव्य केले आहे. साडी घालणाऱ्या महिलेने आपले पाय दाखवणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी खरगपूरमध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
ममतांना दिला होता बरमुडा घालण्याचा सल्ला..
"ममतांना जर आपला प्लास्टर लावलेला पाय सर्वांना दाखवायचा असेल, तर त्या बरमुडा का नाहीत घालत?" असे वक्तव्य घोष यांनी केले होते. याबाबत बोलताना "ममता या आपल्या मुख्यमंत्री आहेत. त्यांनी नीटनेटके रहावे अशी आपल्या सर्वांना अपेक्षा आहे. साडी घातलेल्या महिलेने आपल्या पायांचे प्रदर्शन करणे चुकीचे आहे. लोकांना ते आक्षेपार्ह वाटत आहे, मलाही ते आक्षेपार्ह वाटले त्यामुळे मी तसे म्हणालो" अशी सारवासारव त्यांनी आज केली.
बरमुडा वक्तव्यावरुन रोष..
घोष यांच्या वक्तव्यानंतर तृणमूलच्या नेत्या आणि खासदार मोहुआ मोईत्रा यांनी रोष व्यक्त केला होता. "ममतांना बरमुडा घालण्याचा सल्ला देणारी ही विकृत माकडं बंगालमध्ये जिंकण्याची स्वप्नं पाहत आहेत" असे म्हणत त्यांनी घोष यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही घोष यांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. अशा प्रकारची भाषा ही भाजपची महिला-विरोधी मानसिकता दाखवते, यामुळेच हे लोक बंगाल निवडणूक हरणार आहेत, असे चतुर्वेदी म्हणाल्या होत्या.
हेही वाचा : GNCTD विधेयकाविरोधात 'आप' जाणार सर्वोच्च न्यायालयात