बंगळुरू (कर्नाटक) - राज्यात भाजप सरकार स्थापन होऊन दोन वर्ष झाल्यानंतर आता नेतृत्त्वबदलाचे संकेत आहेत. भाजपच्या पक्षश्रेष्टींकडून कोरोनाची तिसऱ्या लाटेचे संकट पाहता लवकरात मुख्यमंत्री येदियुरप्पांकडून राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. 26 जुलैला राज्यातील भाजप सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. यानंतर आता भाजप मुख्यमंत्रीपदासाठी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नविन चेहऱ्याच्या शोधात आहेत. नविन नेत्याला संधी दिल्यास पुढच्या निवडणुकांमुळे संघटन आणखी मजबूत होऊ शकते, असा पक्षाचा आग्रह आहे. भविष्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेतृत्व बदल करण्यात येत आहे, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
येदियुरप्पांना पक्षश्रेष्टींकडून तत्काळ राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे, अशीही माहिती मिळत आहे. दरम्यान, येदियुरप्पांनी यासाठी थोडा वेळ मागितला असल्याची माहिती, सूत्रांनी दिली. ज्येष्ठ नेत्यांनी तारीख न सांगता, बीएस येदियुरप्पा यांना महिन्याची मुदत दिली आहे.
येदीयुरप्पांना जास्त वेळ न देण्याचे कारण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आहे. जर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली तर कमीतकमी सहा महिन्यांपर्यंत मुख्यमंत्रीपद बदलता येणार नाही. त्यानंतर कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीसाठी फक्त एक वर्ष उरणार आहे. येत्या 2023 मध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणूक होणार आहे. इतक्या कमी वेळात नविन मुख्यमंत्री त्यांची ताकद दाखवण्यास, जनतेची मने जिंकण्यास सक्षम असू शकत नाही. हेच येदियुरप्पांच्या राजीनामा मागण्यामागचे कारण असू शकते, असे बोलले जात आहे.
भाजपमध्ये 75 वर्षांवरील व्यक्तींना महत्त्वांच्या पदांवर ठेवले जात नाही. तरी त्याला येदियुरप्पा हे अपवाद ठरले होते. त्यांची दोन वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. त्यांच्या मुख्ममंत्रीपदाच्या कार्यकाळाला 26 जुलैला दोन वर्ष पूर्ण होत आहे.
दरम्यान, बीएस येदियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे चिरंजीव विजेयंद्र उपमुख्यमंत्रिपद किंवा ऊर्जा, जलसंपदा, अर्थ आणि सार्वजनिक बांधकाम यांसारखे महत्त्वाचे मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. सध्या विजेयंद्र यांच्याकडे भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाचा कार्यभार आहे. ते प्रदेशाध्यक्ष बनविले जाण्याकडेही त्यांचे डोळे लागले आहेत.