मुंबई - महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांच्या संख्येनुसार राज्यसभेवर सहा जण महाराष्ट्रातून निवडून जाणार आहेत. 10 जूनला होणाऱ्या निवडणुकीत सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे. भाजपचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार निश्चितपणे निवडून येईल, असे संख्याबळ त्या त्या पक्षांकडे आहे. सहाव्या जागेसाठी मात्र भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. निवडणुकीचा दिवस जवळ आल्याने महाविकास आघाडी आणि भाजपनेही युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, राजकीय हालचाली वेगाने होत असून शिवसेनेने आज आपल्या आमदारांना हॉटेल द रिट्रीटमधून ट्रायडंट हॉटेलमध्ये हलविले आहे.
संभाजीराजेंची एन्ट्री आणि एक्झिट - या निवडणुकीमध्ये प्रारंभीच रंगत निर्माण झाली ती संभाजीराजेंच्या एन्ट्रीने. राज्यसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम संभाजीराजेंनी आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. सर्वच पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी आवाहन करीत त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या. संभाजीराजेंनी ( Sambhaji Raje ) निवडणूक लढविण्याचे जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी राजेंना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर करून टाकले. मात्र, दोनच दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना मागच्यावेळी शिवसेनेने त्यांची मते राष्ट्रवादीला दिली होती याची आठवण करून दिली. त्यानंतर शरद पवारांनी संभाजीराजेंना जाहीर केलेला पाठिंबा मागे घेतला आणि यावेळी शिवसेनेला आपले मत देण्याचा शब्द आपण दिला होता, असे सांगत सेनेला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. राजकीय पटलावर घडामोडी घडत असताना शिवसेनेने संभाजीराजेंना उमेदवारी देण्यासाठी शिवबंधन बांधण्याची अट घातली. ही अट संभाजीराजेंना मान्य नव्हती.
संभाजी राजेंचा आरोप - संभाजीराजेंनी एक पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरविल्याचा थेट आरोप केला. त्यामुळे मोठा राजकीय गोंधळ उडाला आणि आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली. या सर्व घडामोडींनंतर संभाजीराजेंनी आपली उमेदवारी मागे घेतली.
सहाव्या जागेसाठी भाजपचाही दावा - भाजपचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची प्रत्येकी एक जागा सहज निवडून येऊ शकते. मात्र, सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी व अपक्षांच्या मतांच्या जोरावर शिवसेनेने दावा केला आहे तर भाजपनेही आपल्याकडे असलेल्या अधिकच्या मतांच्या जोरावर आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार म्हणून कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना तर भाजपने धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे.
मतांचे गणित आणि घोडेबाजाराच्या चर्चा - राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्र विधिमंडळातील 288 आमदारांच्या संख्याबळानुसार सहा जण राज्यसभेवर जाऊ शकतात. निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या फेरीतील पहिल्या पसंतीची 42 मते मिळणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास दुसऱ्या फेरीतील मतांची त्या उमेदवाराला गरज भासेल. भाजपकडे विधानसभेत भाजपचे 105 आमदार आहेत. याशिवाय काही अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे. आपल्या आमदार संख्येच्या जोरावर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. आपल्या तिसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी त्यांना आणखी 12-13 मतांची गरज भासणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला आपली दुसरी जागा निवडून आणण्यासाठी काही मते कमी पडणार आहेत. काँग्रेसचे अतिरिक्त एक मत, राष्ट्रवादी काँग्रेसची 12 मते आणि शिवसेनेची अतिरिक्त 13 मते अशी 26 मते त्यांच्याकडे हमखास आहेत. सरकारला पाठिंबा दिलेल्या काही अपक्षांनी, छोट्या पक्षांनी पाठिंबा दिल्याचा दावा खासदार संजय राऊत सातत्याने करीत आहेत. तथापि, अद्यापही शिवसेनेला आणखी 10-12 मतांची गरज भासत आहे. त्यामुळेच चुरस निर्माण झाली आहे.
अनिल देशमुख, नवाब मलिकांबाबत प्रश्नचिन्ह - राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांना अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) केलेल्या कारवाईनंतर अटक झाली आहे. हे दोघेही अटकेत असल्याने त्यांच्या मतदानाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आठ तारखेला त्याबाबत निर्णय होणार आहे. त्यांना मतदान करता आले नाही, तर शिवसेनेच्या अडचणीत वाढ होऊ शकते. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचे हक्काचे एक मत कमी झाले आहे.
काँग्रेसच्या गोटातही अस्वस्थता - काँग्रेसची एक जागा मतांच्या संख्येनुसार निवडून येऊ शकते. तथापि, काँग्रेसने महाराष्ट्रातील मुकुल वासनिक यांना राजस्थानातून तर उत्तरप्रदेशच्या इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही काँग्रेस आमदारांनी बाहेरचा उमेदवार का लादला जात आहे, अशी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या नाराज आमदारांमुळे मते फुटतील, अशी चर्चा आहे.
अपक्षांवर मदार - भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची आता अपक्ष आमदारांवर नजर आहे. दोन्ही पक्षांनी अधिकाधिक अपक्ष आमदार आपल्याला मतदान करतील यासाठी जोर लावला आहे. अपक्ष कुठे मतदान करणार यावर सहाव्या जागेचा निर्णय होणार आहे.
ठाकरे-फडणविसांचा कस लागणार - या सत्तेच्या खेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या राजकीय अनुभवाचा, राजकीय खेळींचा कस लागणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. सोमवारी त्यांनी शिवसेना, काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेतली होती. आजही (मंगळवार) त्यांनी महाविकास आघाडीची बैठक बोलाविली आहे. काही अपक्ष, छोटे पक्षही त्यांच्या बैठकीस उपस्थित राहतील. दुसरीकडे भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याने ते आपल्या निवासस्थानी आराम करीत आहेत. मात्र, घरूनच ते निवडणुकीची रणनिती आखत असून अनेक अपक्षांशी त्यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा केली असल्याचे सूत्रांकडून कळते.
ओवेसी म्हणतात बोलावणं आल्याशिवाय नाही - या निवडणुकीत एमआयएमच्या दोन आमदारांचे मत कुणाकडे जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजप आणि महाविकास आघाडी दोघांशीही समान अंतर राखून असलेल्या एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांचा कल आता महाविकास आघाडीकडे असल्याचे दिसत आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने आम्हाला मदत मागावी, असे आवाहन ओवेसी यांनी केले आहे. “आम्हाला अद्याप महाविकास आघाडीकडून कोणीही संपर्क साधलेला नाही. महाविकास आघाडीला गरज असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही वाट पाहू. त्यांना गरज नसेल तर आम्ही आमचा निर्णय घेऊ. आमच्या आमदारांचे मत कोणाच्या पारड्यात टाकायचे याचा एक-दोन दिवसात निर्णय घेऊ”, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले. प्रत्येक मत महत्त्वाचं असल्याने ओवेसींनी एकप्रकारे शिवसेनेला ऑफरच दिली आहे.
शिवसेनेने आमदारांना ट्रायडंटमध्ये हलविले - मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा बंगल्यावर सोमवारी झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेच्या आमदारांना सोमवारी रात्री 'द रिट्रीट' हॉटेलमध्ये नेण्यात आले होते. या आमदारांना मंगळवारी दुपारी विधानभवनापासून काही अंतरावर असलेल्या दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बसने नेण्यात आले. द रिट्रीटमध्ये शिवसेनेचे २५ आमदार होते. ते सर्व ट्रायडंटमध्ये गेल्याचे कळते. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 6 वाजता सर्व आमदारांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व आमदार आमदारांना एकाच ठिकाणी ठेवून चर्चा केली जाईल, दरम्यान शिवसेनेच्या गोटात पूर्ण समाधान आहे व यावेळी शिवसेनेचा राज्यसभेचा उमेदवार नक्कीच विजयी होणार आणि भाजपचा पराभव होणार याची त्यांना खात्री आहे. राज्यसभा निवडणुकीत कोणताही दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेने आमदारांना हॉटेलमध्ये एका ठिकाणी नेल्याचे बोलले जाते. तथापि, खासदार संजय राऊत यांनी मात्र मतदानाची प्रक्रिया किचकट असल्याने आमदारांना मार्गदर्शनासाठी इथे ठेवल्याचे सांगितले आहे. भाजप आणि काँग्रेसनेही आपापले आमदार हॉटेलमध्ये हलविल्याचेही ते म्हणाले. राज्यसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने पियुष गोयल, डॉ. अनिल भोंडे, धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी मिळाली आहे. तर काँग्रेसने उत्तरप्रदेशातील नेते इम्रान प्रतापगढी यांना उमेदवार केले आहे.
निवडणूक कार्यक्रम - राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी 24 मे रोजी अधिसूचना जारी झाली. 31 मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत होती. 1 जून रोजी दाखल झालेल्या अर्जांची छाननी निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. अर्ज मागे घेण्याची मुदत 3 जूनपर्यंत होती. सहा जागा आणि उमेदवार सात असल्याने आता 10 जून रोजी मतदान होणार आहे. 10 जूनला सकाळी 9 ते 4 पर्यंत मतदान होईल तर त्याच दिवशी पाच वाजेपासून मतदान मोजणीस सुरुवात होईल.