नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याने आज सकाळी पंजाबमधील मोगा येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून, अमृतपाल १८ मार्चपासून फरार होता. पाच महिन्यांपूर्वी अमृतपाल हा 'वारीस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख बनला होता. तेव्हापासून अमृतपाल सतत चर्चेत आहे. अमृतपालने 5 महिन्यांत तीन वेळा सरकारला इशारा दिला होता, त्यानंतर तो शीख तरुणांमध्ये लोकप्रिय झाला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुबईहून परतलेल्या अमृतपालला 29 सप्टेंबर 2022 रोजी 'वारीस पंजाब दे'चे प्रमुख बनवण्यात आले होते, त्यानंतर अमृतपालने हजारोंच्या जमावासमोर वेगळ्या खलिस्तानची मागणी केली होती. यानंतर अमृतपाल याने रॅली काढली. रॅलीदरम्यान अमृतपाल यांनी शीख समुदायाला कोणत्याही किंमतीत स्वातंत्र्य मिळवून देणार असल्याचे सांगितले होते. त्याने जर्नेलसिंग भिंद्रनवाले हे त्याचे प्रेरणास्थान मानले होते. आम्ही अजूनही गुलाम आहोत, जोपर्यंत खलिस्तान घेत नाही तोपर्यंत आम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही, असे अमृतपाल याने शीखांसमोर म्हटले होते.
पाच महिन्यांत तीन वेळा सरकारला इशारा देण्यात आला
पहिला इशारा- अमृतपाल सिंह याने 29 सप्टेंबर 2022 रोजी सरकारला पहिला इशारा दिला होता. यादरम्यान अमृतपाल म्हणाला होता की, दिल्ली सरकार यूपी, बिहार, उत्तराखंड आणि हिमाचलच्या लोकांना पंजाबमध्ये शिखांना मारहाण करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. दिल्ली सरकार आपल्या हेतूंमध्ये यशस्वी होणार नाही. अमृतपाल म्हणाला की, 'पंजाब स्वतंत्र राहील'.
दुसरा इशारा- त्यानंतर अमृतपालने 30 ऑक्टोबर 2022 रोजी अमृतसरमध्ये 'खलिस्तानला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत मी आहे' असे म्हटले होते. त्याने केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालन करू नये, असे शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीला माध्यमांसमोर सांगितले. शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने स्वतःचे संविधान तयार करावे, असेही तो म्हणाला होता.
तिसरा इशारा- अमृतपाल याने 23 फेब्रुवारी 2023 रोजी सांगितले होते की, इंदिरा गांधींच्या काळापासून खलिस्तानची मागणी दाबली जात आहे. खलिस्तानचा आवाज दाबणाऱ्या इंदिरा गांधींना त्याचा फटका सहन करावा लागला. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि भगवंत मान यांना संबोधित करताना अमृतपाल म्हणाला होता की, त्याला कोणीही रोखू शकत नाही.
अमृतपाल भिंद्रनवालेला गुरू मानतो: पंजाबमधील अमृतसरमधील जल्लूपूर खेडा गावातील रहिवासी असलेला अमृतपाल प्रसिद्ध खलिस्तानी समर्थक जर्नेल सिंग भिंद्रनवाले याला आपला गुरू मानतो. वयाच्या १८ व्या वर्षी दुबईला गेलेला अमृतपाल २०२२ मध्ये परतला, त्यानंतर तो 'वारीस पंजाब दे'चा सदस्य झाला. अमृतपाल भिंद्रनवालेसारखा जड पगडी घालतो. अमृतपाल प्रत्येक जाहीर सभेत 'राज करेगा खालसा'चा नारा देत असे.
अमृतपाल सिंगच्या मागे कोण आहे: मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंजाबमध्ये 'खलिस्तान चळवळ' भडकावण्यामागे पाकिस्तानचे लष्कर आणि त्याची गुप्तचर संस्था ISI आहे. याशिवाय काही विदेशी खलिस्तान समर्थक संघटना अमृतपाल सिंगला आर्थिक मदत करत आहेत.