हल्दिया - पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज हल्दिया, खेजुरी आणि पानसकुरा येथे सभांना संबोधित केले. हल्दियात मोर्चाला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला. भाजपा केवळ खोटी आश्वासने देतो. जिथे निवडणुका होतात, तिथे भाजपा आश्वासने देऊन निवडणूक जिंकते आणि विसरते, असे त्या म्हणाल्या.
बंगालमध्ये एनआरसी लागू होऊ देणार नाही. भाजपा सरकारकडे एनपीआर आणि एनआरसी कार्ड आहेत. तसेच त्यांनी बँका विकल्या, बीएसएनएल विकलं, दोन दिवसांनंतर अशी वेळ येईल, जेव्हा पीएम मोदी हल्दियालाही विकतील. पंतप्रधान मोदींनी सर्व काही थांबवले आहे. परंतु फक्त बंगाल सुरू होता आणि राहिल, असे त्या म्हणाल्या.
बंगालच्या लोकांसाठी लस मागितली. तेव्हा आम्ही ती दिली नाही. मात्र, बिहार निवडणुकीच्या वेळी मोफत लस देण्याचे आश्वासन दिले. बिहार निवडणूक होऊन चार ते पाच महिने झाले आहेत. मात्र, लस दिली गेली नाही, असेही त्या म्हणाल्या.
पश्चिम बंगालची राजकीय स्थिती काय?
पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार असून 2 मे रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 211 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 44, डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.
हेही वाचा - मराठा आरक्षण : अजून किती पिढ्या आरक्षण सुरू राहणार, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल