आगरतळा (त्रिपूरा)- कोरोना महामारीत हातावर पोट असणाऱ्या मजूरांचे हाल होत आहेत. त्यांना एकवेळच्या जेवणाची भ्रांत होत आहे. यात कामगार काकुळतीला आला आहे. अशा कठिण परिस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार नेते बिप्लब कर यांनी अगरतळा शहरात गरिब आणि गरजूंसाठी कम्यूनिटी किचनची सुरूवात केली आहे. या कम्यूनिटी किचनच्या माध्यमातून गरजूंना दुपारचे जेवण चक्क एका रुपयात दिलं जात आहे. कर हे डावे विचाराचे असून ते राजकारणात सक्रिय होते. ते २०१८ च्या विधानसभा निवडणूकीत सत्ताधारी भाजप पक्षाला तत्वत: पाठिंबा दिल्याने चर्चेत आले होते.
कर यांनी मजूर, रिक्षा चालक आणि प्रवाशांचे हाल पाहिले. तेव्हा त्यांनी कोणी उपाशी राहू नये, यासाठी प्रभावी पाऊले उचलण्यास सुरूवात केली. त्यांनी त्यांच्या संस्थेच्या राज्यस्तरीय बैठकीत शिजविलेले अन्न वितरण अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला. या अभियानाला 23 जूनपासून सुरूवात करण्यात आली. कर यांच्या मनात तीन महिन्यापूर्वीच या अभियानाची सुरूवात करण्याचा विचार होता.
कर यांनी याविषयी सांगितलं की, 'आम्हाला मदत प्राप्त झाली त्यानंतर आम्ही कम्यूनिटी किचन सुरू केला. आम्ही मदत म्हणून लोकांकडून पैसे घेत नाही. दररोज आम्ही जवळपास २०० लोकांना या अभियानाच्या माध्यमातून जेवण देत आहेत. यात पाच दिवस शाकाहारी तर एक दिवस अंडी तर एक दिवस मासे देत आहेत. हे आमचे आठवड्याचे नियोजन आहे. पुढे ५० ते १०० लोकांसाठी आणखी प्लेट वाढवण्याची आमची योजना आहे. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.'
हेही वाचा - बीडमध्ये विवाहितेची हत्या झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल
हेही वाचा - कोरोनाचे नियम पायदळी तुडवत भाजपाचे आंदोलन, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारवर घणाघात