उज्जैन (मध्य प्रदेश) : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा शनिवारी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाकालेश्वर मंदिरात दर्शनास पोहोचले. त्यांनी येथे पहाटे 3 वाजता होणाऱ्या भस्म आरतीत सहभागी होऊन महाकालचे आशीर्वाद घेतले. दर्शनानंतर दोघांनीही नंदी हॉलमध्ये बसून महाकालची पूजा देखील केली. या सोबतच त्यांनी गर्भगृहात जाऊन भगवान महाकालचा आशीर्वाद घेतला. इंदूरमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली मध्य प्रदेशात आला होता.
नंदीहाळात महाकाल आरती केली : बॉर्डर - गावस्कर ट्रॉफी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. इंदूरमध्ये 1 मार्चपासून सुरु असलेला तिसरा कसोटी सामना काल संपला. दरम्यान, अनेक खेळाडू आपल्या पत्नीसह बाबा महाकालच्या दर्शनासाठी आले होते. विराट कोहलीनेही शनिवारी बाबा महाकालचे दर्शन घेतले. शनिवारी सकाळी विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत बाबा महाकालचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचला. यावेळी अनुष्का शर्माने साधी साडी घातली होती तर विराट कोहलीने धोती चोला परिधान केला होता. पती - पत्नीने नंदीहाळात बसून भगवान महाकालच्या भस्म आरतीचा आनंद घेतला.
गर्भगृहात पूजा अभिषेक केला : बाबा महाकालची भस्म आरती संपल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी महाकालच्या गर्भगृहात जाऊन पूजा अभिषेक केला. तेथे दोघांनी ध्यान केले आणि देवाचे आशीर्वाद घेतले. महाकाल मंदिराचे पुजारी प्रदीप गुरु यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. त्यांनी बाबा महाकाल यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. या आधीही अनेक भारतीय क्रिकेटपटू बाबा महाकालच्या दर्शनासाठी आले आहेत.
सदैव भाविकांची गर्दी : खरे तर जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग बाबा महाकाल यांचे निवासस्थान हे लाखो भाविकांचे विशेष श्रद्धेचे केंद्र आहे. बाबांच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भक्त पोहोचतात. इंदूरमध्ये कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारताचा सलामी फलंदाज के.एल. राहुल पत्नी अथिया शेट्टीसोबत आला होता. तर गेल्या महिन्यात फिरकीपटू अक्षर पटेल त्याची पत्नी मेहासोबत पोहोचला होता. या दोघांचेही नुकतेच लग्न झाले आहे.