नवी दिल्ली - लडाख सीमेवरून सैन्य मागे घेतल्यानंतर भारत आणि चीनमध्ये लष्कराच्या कॉर्प्स कमांडर स्तरावरील 10 वी बैठक उद्या (शनिवार) होणार आहे. यातच चीनच्या सरकारी माध्यमांनी गलवानच्या खोऱ्यामध्ये झालेल्या हिंसक झटापटीचा थरारक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय आणि चीन सैनिक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे.
नदीच्या पात्रामधून दोन्ही बाजूकडील सैनिक एकमेकांशी हुज्जत घालताना दिसत आहे. चीनने गुरुवारी पहिल्यांदाच गलवानमधील हिंसेमध्ये पाच चिनी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे मान्य केले होते. त्यानंतर त्यांनी आज हा व्हिडिओ जारी केला आहे. हा व्हिडिओ विविध क्लिप एकत्र करून तयार केल्याचे दिसत आहे. रात्रींच्या अंधारातील ही काही दृश्य असून मोठा आरडाओरड होतानाचे पाहायला मिळत आहे.
एप्रिलनंतर भारतीय सैन्य कराराचे उल्लंघन करत होते. त्यांनी पुल आणि रस्ता बनवण्यासाठी सीमा पार केली. कराराचा सन्मान राखून आम्ही चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटण्याचा प्रयत्न केला, असे व्हिडिओ जारी करत चीनने म्हटलं आहे.
भारताचे 20 जवान शहीद -
15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारतीय सैन्यदलाचे 20 जवान शहीद झाले होते. भारत-चीन सैन्यादरम्यानचा गेल्या चार दशकांतील हा सर्वात हिंसक तणाव असल्याचे यानंतर सांगितले गेले. भारताने या घटनेनंतर लगेचच आपले सैनिक शहीद झाल्याची माहिती जारी केली होती. मात्र चीनने याविषयी कसलिही अधिकृत माहिती जारी केलेली नव्हती. मात्र आता प्रथमच चीनने आपले जवान ठार झाल्याची कबुली देत जवानांची माहितीही सार्वजनिक केली आहे. दरम्यान, 10 फेब्रुवारी रोजी प्रकाशित केलेल्या एका वृत्तात रशियन वृत्तसंस्था टासने गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत चीनचे 45 जवान ठार झाल्याचे म्हटले होते.
चीनच्या ठार सैनिकांची माहिती -
ठार झालेल्यांमध्ये पीएलए शिन्जियांग लष्करी कमांडचे रेजिमेंटल कमांडर क्वि फाबाओ यांचा समावेश असल्याचे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. क्वि फाबाओ यांना केंद्रीय सैन्य आयोगाने हिरो रेजिमेंटल कमांडर या मरणोत्तर सन्मानाने गौरविले आहे. तर चेन होन्जुंग यांना हिरो टु डिफेंड द बॉर्डर आणि चेन शियान्ग्रॉन्ग, शियाओ सियुआन आणि वांग झुओरान यांना फर्स्ट क्लास मेरीट सन्मानाने गौरविले आहे.
सैन्य माघारी जाण्याची प्रक्रिया सुरू -
मागील एक वर्षापासून भारत चीन सीमेवर तणाव सुरू होता. गलवान खोरे, पँगाँग सरोवर भागात दोन्ही देशाचे सैन्य आमनेसामने उभे होते. मात्र, आता सैन्य माघारी जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सीमेवर एप्रिल 2020 नंतर जे काही बांधकाम दोन्ही देशांनी केले असेल ते सर्व काढून टाकण्यात येईल आणि जैसे थे स्थिती आणली जाईल. पूर्वीप्रमाणे चीन त्यांचे सैन्य फिंगर ८ (गस्त पाँईन्ट) पर्यंत मागे घेईल तर भारतीय सैन्य फिंगर ३ जवळ थांबेल. जे काही मुद्दे सीमावादात राहीले आहेत, त्यांच्यावरही चर्चा सुरू आहे. लवकरच त्यावरही तोडगा काढला जाणार आहे.
उद्या बैठक -
लडाख सीमेवरून सैन्य मागे घेतल्यानंतर भारत आणि चीनमध्ये लष्कराच्या कॉर्प्स कमांडर स्तरावरील 10 वी बैठक उद्या (शनिवार) होणार आहे. पँगाँग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर सीमेवरून भारत आणि चीनचे सैन्य पूर्णपणे मागे हटले आहे. चीनच्या बाजूकडील मोल्डो येथे ही बैठक होणार आहे. गलवान वगळता इतर अनेक ठिकाणी भारत चीन सीमेवरून वाद आहेत. त्यावर या बैठकीत चर्चा होण्याची माहिती सुत्रांनी दिली.