पणजी: माजी केंद्रीय मंत्री आणि चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेले दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी भाजपने तिकीट नाकारल्या नंतर पणजीतून अपक्ष निवडणूक लढवत भाजपला मोठे आव्हान दिलेे.
1994 पासून ते 2019 पर्यंत म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत मनोहर पर्रिकर यांनी पणजी मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले, तेथेच उत्पल यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे.
उत्पल यांनी परदेशात अभियंता विषयाचे शिक्षण घेतलेले आहे, या निवडणुकीत त्यांनी मनोहर पर्रीकरांचा राजकीय वारस म्हणून जनतेसमोर जाण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्यांनी तशी "एकनिष्ठता"ही दाखवली आहे. त्यांना “माईक” हे मतदान चिन्ह मिळाले होते. त्यांना त्याच्या गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा पाठिंबा मिळू शकतो, ज्यांनी पणजीचे पाच वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या मनोहर पर्रिकर यांना नेहमीच पाठिंबा दिला होता. याशिवाय अनेक ख्रिश्चन उच्चभ्रू देखील उत्पल यांच्या बाजूने उभे राहिले असावेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पणजी विधानसभा निवडणुकीत उत्पल यांच्या उमेदवारी मुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपच्या वतीने बाबुश मोंसरात यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे, नाराज उत्पल पर्रीकर यांनी त्यांच्या विरोधात जोरदार लढत दिली आहे. शिवसेनेही उत्पल यांच्या विरोधात उमेदवार न देता त्यांना पाठिंबा दिला आहे. या शिवाय अनेक संघटनांनी उत्पलला उघड आणि छुपा पाठिंबा दिल्यामुळे या निवडीवर सगळ्यांचे लक्ष राहणार आहे.
उत्पल यांना भाजपने डावलून बाबुश मोंसरात याना तिकीट दिले. मात्र, राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले होते की, उत्पल पर्रीकर यांना तिकीट देण्यासाठी त्यांचे कर्तृत्व मोठे नाही, म्हणून आम्ही त्यांना तिकीट दिले नाही. इथूनच उत्पल पर्रीकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि फडणवीस यांच्यावर पर्रीकर यांनी जोरदार टीका केली. त्यामुळेच, पणजीची उमेदवारी देण्यात आलेल्या बाबुश मोंसरात यांना विजयी करण्याचे सर्वात मोठे आव्हान भाजपा आणि पर्यायाने फडणवीस यांच्या समोर उभे टाकले होते.
हेही वाचा : Goa Election: मोठ्या आव्हानांनतरही डाॅ प्रमोद सावंत विजयावर ठाम